मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील टोंक कला परिसरातील फटाक्यांच्या कारखान्यात गुरुवारी (१४ मे) सकाळी सुमारे ११.३० वाजता भीषण स्फोट होऊन त्यानंतर मोठी आग लागली.
देवास (Dewas Factory Blast) : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील टोंक कला परिसरातील फटाक्यांच्या कारखान्यात गुरुवारी (१४ मे) सकाळी सुमारे ११.३० वाजता भीषण स्फोट होऊन त्यानंतर मोठी आग लागली. या दुर्घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्फोट इतका भीषण होता की काहींचे अवयव २० ते २५ फूट अंतरावर विखुरले गेल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाच्या वेळी कारखान्यात सुमारे २०० महिला काम करत होत्या, अशीही माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेची दखल घेत जिल्ह्याचे प्रभारी मंत्री व उपमुख्यमंत्री जगदीश देवडा , गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री मोहन् यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. “बाबा महाकाल यांच्या चरणी दिवंगत आत्म्यांना शांती लाभो, दुःखी कुटुंबियांना धैर्य मिळो आणि जखमींना लवकर बरे होण्याची शक्ती मिळो,” अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी कारखान्याबाहेर गर्दी केली. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अधिकृत चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.