कॅनॉट प्लेसमध्ये सायंकाळी ५ वाजता आंदोलनाचे नियोजन; सेंट्रल पार्क परिसरात कडेकोट बंदोबस्त, दीपके यांना पोलिसांकडून नोटीस
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. आज, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये हे आंदोलन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, आंदोलनाला परवानगी नसल्याने दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. आंदोलनाचे आयोजक अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी १५ ते २० पोलीस पोहोचले असून, त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. दीपके यांना पोलिसांनी नोटीस बजावल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्यांना अटक होणार की आंदोलनासाठी काही अटी घातल्या जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
🚨 ATTENTION PLEASE! 🚨 Delhi Police are accusing Abhijeet Dipke of talking about violence, while sidelining the ground reality and making baseless allegations against him. https://t.co/WLTFtPO5Oa
— Neha Bora Team (@NehaAisa) October 16, 2026
काय आहे ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनामागचे कारण?
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना तिरंगा फडकवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ अभिजीत दीपके यांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे. जंतर-मंतर येथे तिरंगा फडकवल्यानंतर नियमभंगाचे आरोप ठेवण्यात आल्याची माहिती आहे. न्यायालयाने सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, ते सध्या तिहार कारागृहात आहेत.
#WATCH | Delhi Police personnel arrive at the residence of NCP-SCP spokesperson Anish Gawande, where CJP Founder Abhijeet Dipke is staying. Abhijeet Dipke has called for a ‘Lehra Do Tiranga’ protest at Connaught Place’s Central Park today. https://t.co/kCdkGpUDJU
— ANI (@ANI) October 16, 2026
या कारवाईचा निषेध करण्यासाठी CJP च्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन आंदोलन करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी दीपके यांच्या निवासस्थानी धाव घेतली. पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता असल्याचे दीपके यांनी यापूर्वी व्यक्त केले होते.
दिल्लीतील संवेदनशील भागात सुरक्षा वाढवली
कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क येथे आंदोलन होण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. संवेदनशील भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कॅनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS)च्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, आंदोलनापासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, दिल्ली महानगरपालिकेने प्रशासकीय कारणास्तव १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आंदोलनाच्या नियोजनावर आणि कार्यकर्त्यांच्या एकत्र येण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आंदोलनाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार
सेंट्रल पार्कमधील आंदोलनामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत काही व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, या प्रकरणाशी संबंधित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने सध्या हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
दिल्ली उच्च न्यायालय या प्रकरणाचा विचार करत असताना समांतर हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलनाला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना तातडीचा दिलासा मिळाला नाही.
आता दिल्ली पोलिसांची भूमिका काय असणार?
कॅनॉट प्लेस हा दिल्लीतील प्रमुख व्यावसायिक आणि सार्वजनिक परिसर आहे. त्यामुळे आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. एकीकडे CJP कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी वाढवली आहे.
अभिजीत दीपके यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीनंतर पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, त्यांना अटक होते का आणि आंदोलनाला काही अटींसह परवानगी मिळते का, हे महत्त्वाचे ठरणार आहे. नियोजित वेळेनुसार ‘लहरा दो तिरंगा’ मार्च होणार की पोलिसांच्या कारवाईमुळे त्यात बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.