ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलन; CJP कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) उद्याच्या आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात येणार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर ठरावीक वेळेत पोहोचणाऱ्या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, काही जिल्ह्यांमध्ये CJP कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
10 ऑक्टोबरच्या आंदोलनासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजल्यानंतर संबंधित मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत नवी दिल्ली किंवा हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर पोहोचणाऱ्या सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांनी या निर्णयाची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने दिल्लीत होणारी संभाव्य गर्दी आणि सुरक्षेचा मुद्दा यामुळे या निर्णयाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
जंतर मंतरवरील आंदोलनावेळी निर्माण झाली होती तणावाची स्थिती
यापूर्वी कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केले होते. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनस्थळी दाखल झाले होते. जंतर मंतरच्या परिसरापुरते आंदोलन मर्यादित न राहता अनेक विद्यार्थी रस्त्यावरही उतरले होते.
विद्यार्थ्यांनी संसदेच्या दिशेने मोर्चा काढल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर गंभीर आव्हान उभे राहिले होते. या घडामोडींनंतर संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
अभिजीत दिपके यांचे विद्यार्थ्यांना दिल्लीत येण्याचे आवाहन
CJP चे नेते अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने दिल्लीत येण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीही त्यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही जिल्ह्यांतील CJP कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व घडामोडींमुळे आंदोलनापूर्वीच राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर हालचाली वाढल्या आहेत. रेल्वे गाड्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांनाही आपल्या प्रवासाचे नियोजन बदलावे लागण्याची शक्यता आहे.
दिल्लीत इंडिया आघाडीचेही आंदोलन
दरम्यान, दिल्लीत इंडिया आघाडीकडूनही आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी या आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली. इंडिया आघाडीतील जवळपास सर्वच खासदार या मोर्चात सहभागी झाले होते.
एकीकडे इंडिया आघाडीचे आंदोलन आणि दुसरीकडे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP कडून होणारे आंदोलन, यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या CJP आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि प्रशासनाकडून परिस्थिती कशी हाताळली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.