उत्तर प्रदेश मधील बरेली येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, ३३ वर्षीय प्रॉपर्टी डीलरने आपल्या पाळीव कुत्र्यासह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
लखनऊ (Bareilly Suicide Case) : उत्तर प्रदेश मधील बरेली येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, ३३ वर्षीय प्रॉपर्टी डीलरने आपल्या पाळीव कुत्र्यासह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बरेली शहरातील भाड्याच्या घरातील बंद खोलीत दोघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल अरोरा हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. काही काळापासून तो एकटाच राहत होता आणि प्रॉपर्टी व्यवसाय करत होता. आई-वडिलांच्या उपचारांमुळे त्याची आर्थिक स्थिती खालावली होती. एवढेच नव्हे, तर त्याला स्वतःचे घरही विकावे लागले होते. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते, ज्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता.
या घटनेचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा निखिल आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे जेवायला गेला नाही. संशय आल्याने काही जण त्याच्या घरी गेले असता दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, निखिलचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला, तर त्याच्या शेजारी त्याचा पाळीव कुत्रा ‘प्रेमी’ हाही मृत अवस्थेत आढळून आला.
प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. निखिलने छाछमध्ये सल्फासची गोळी मिसळून आधी आपल्या कुत्र्याला पाजली आणि त्यानंतर स्वतःही तेच मिश्रण पिऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळावरून छाछचे पॅकेट आणि सल्फासची रिकामी डबी पोलिसांनी जप्त केली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, निखिलला आपल्या पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम होते. त्यामुळे स्वतःनंतर त्याची काळजी कोण घेईल या भीतीतून त्याने कुत्र्यालाही विष दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कर्जाच्या ओझ्यामुळे एका व्यक्तीने टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पुढील तपास सुरू आहे.