तीन चोरटे अद्यापही फरारच
हिंगोली (Hingoli Vehicle Theft Crime) : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून शेकडो मोटरसायकल चोरीच्या घटना घडत असताना अखेर स्थानिक गुन्हे शाखेला एक मोठे यश मिळाले आहे. तब्बल शेकडो गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने १ लाख ८५ हजार रुपयाच्या तीन मोटरसायकली जप्त करून दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी कार्यरत होती. गोपनीय माहितीच्या आधारे शेख जुनेद शेख मेमुद्दीन, रा. लक्ष्मीनगर देगलूर नाका, माळटेकडी रोड, नांदेड आणि अब्दुल दानीश अब्दुल रफीक, रा. बेबडा, ता. दर्यापूर, जि. अमरावती या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून बजाज पल्सर कंपनीच्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या (Hingoli Vehicle Theft Crime) कारवाईमुळे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये पो.स्टे. आखाडा बाळापूर, पो.स्टे. कळमनुरी आणि पो.स्टे. अर्धापूर जि. नांदेड या तीन गुन्ह्यांचा समावेश आहे. तपासादरम्यान आरोपींनी त्यांचे आणखी तीन साथीदार शेख शाहीद शेख चाँद रा. खुबा कॉलनी अर्धापूर, मोहम्मद ख्वाजा मोहम्मद मिर रा. नांदेड आणि रिजवान उर्फ पुष्पा रा. नांदेड हिंगोली यांचीही नावे सांगितली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जिल्ह्यात शेकडो वाहने चोरीला गेली असताना केवळ तीन गाड्या जप्त करून तीनच गुन्हे उघड केल्याने या 'मोठ्या' कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उर्वरित शेकडो वाहन चोरीच्या गुन्ह्यांचे काय? असा सवाल वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे हिंगोली शहरातील सन्मती नगर भागातील प्रशांत घुगे या शिक्षकाची चार चाकी कार चोरट्यांनी चोरून नेली.
त्यांच्यासह हिंगोली शहर पोलिसांनी वाहनाचा शोध घेतला असता सदर कार परभणी जिल्ह्यामध्ये मानवत येथे नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज द्वारे स्पष्ट झाले परंतु तेथून चार चाकी कारचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला लावता आला नाही. अशा अनेक (Hingoli Vehicle Theft Crime) वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत जिल्हाभरात प्रत्येक दिवशी वाहन चोरीच्या घटना घडत असताना केवळ १४ पोलिसांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन मोटरसायकल जप्त करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केविलवाना प्रयत्न हा मात्र विषय चर्चेचा बनला आहे.