पोलिसांची नाकाबंदी भेदण्याचा प्रयत्न;
९.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
उदगीर (Udgir Banned Gutkha Transport) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास वाहतूक सुरू असल्याचे उदगीरमधील पोलीस कारवाईतून समोर आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे उदगीर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारी मारुती सुझुकी डिझायर कार पकडली. या कारवाईत १ लाख ८७ हजार ९५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि आठ लाख रुपये किमतीची कार, असा एकूण ९ लाख ८७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचक रघुनाथ मोटे (वय ३१) रा.आपोली ता.गंगाखेड जि.परभणी आणि मोतीराम मुजाजी गायकवाड (वय ३९, रा. आलोली, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांच्यावर उदगीर ग्रामिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.
पोलिसांना एमएच २१ बीएफ ९३९० क्रमांकाच्या कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर उदगीर–बिदर मार्गावर पोलिसांनी सापळा रचला. शेल्हाळ रोडवर संबंधित कार थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र चालकाने कार न थांबविता पुढे नेली. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या (Udgir Banned Gutkha Transport) नाकाबंदीदरम्यान संबंधित कार पोलिसांच्या हाती लागली.
कारची झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा आढळून आला. पोलिसांनी प्रतिबंधित पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त केली. या प्रकरणी पोलीस अंमलदार बजरंग नागनाथ गजलवार यांच्या फिर्यादीवरून १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २.५१ वाजता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१९/२०२६ नोंदविण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरवटे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा अवैध वाहतुकीचे जाळे आणि त्यामागील पुरवठा साखळी तपासातून उघड होणार का?, याकडे आता लक्ष लागले आहे.