एकाचे पाकिट चोरले; सेलू बसस्थानकात एकाच गाडीत दोन चोर्या
सेलू (Selu Bus Stand Theft Case) : दिवाळी निमित्त बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनेत एका महिलेचे सोन्याचे गंठण तर एकाचे पाकिट लंपास केले. ही घटना बुधवार ४ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली.
पाथरी- बुलढाणा एम.एच. २० बी.एल ४०८५ या बसमध्ये लोणारला जाण्यासाठी चढत असताना अश्विनी विठ्ठल पालवे यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे गंठण लंपास करण्यात आले. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी शेख मकसुद या तरुणाच्या खिशातील तीन हजार रुपये असलेले पाकिटही चोरले. एकाचवेळी दोन प्रवाशांना चोरीचा फटका बसला. या घटनेनंतर बसस्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एकाच गाडीत चोरीच्या दोन घटना घडल्या.
बसस्थानकातील पोलीस चौकी बंद
बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र गेल्या आठ दिवसापासून ही चौकी बंद आहे. दिवाळी निमित्त बसस्थानकात गर्दी होत असताना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेली पोलीस चौकी बंद असल्याने चोरट्यांचे फावले आहे. पोलीस चौकी तात्काळ सुरू करावी, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.