Parvinder Singh Jhota

पंजाबमध्ये ड्रग्जविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; फेसबुक लाइव्हमध्ये थरारक घटना कैद

पंजाबच्या मानसात नशाविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांची हत्या. मेडिकल स्टोअर मालक आरोपी फरार; घटनेनंतर भगवंत मान सरकारवर विरोधकांची टीका.

पंजाबमध्ये ड्रग्जविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; फेसबुक लाइव्हमध्ये थरारक घटना कैद

Parvinder Singh Jhota

मानसा येथे मेडिकल स्टोअरबाहेर वादानंतर गोळीबार; औषध विक्रेत्याचा शोध सुरू, विरोधकांकडून भगवंत मान सरकारवर टीका

चंदीगड : पंजाबमधील मानसा येथे अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात आवाज उठवणाऱ्या परविंदर सिंह झोटा यांची मंगळवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मेडिकल स्टोअरमधून नशेसाठी वापरली जाणारी औषधे विकली जात असल्याचा आरोप करत झोटा यांनी संबंधित दुकानदाराला जाब विचारला होता. या वादाचे चित्रण ते फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून करत असताना गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी मेडिकल स्टोअर मालक अश्वनी कुमार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गोळीबारात झोटा यांचा एक सहकारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.झोटा हे दुकानाबाहेर उभे राहून कथितरीत्या अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप करत असल्याचे फेसबुक लाइव्हमधील व्हिडिओत दिसते. त्यांच्यासोबत एक वृद्ध व्यक्तीही होती. या व्यक्तीने संबंधित दुकानातून नशेची औषधे खरेदी केल्याचा दावा झोटा यांनी केला. यानंतर त्यांचा आणि दुकानदाराचा वाद वाढत गेला. दुकानदाराच्या हातात पिस्तूल असल्याचेही व्हिडिओत दिसत असल्याचे वृत्त आहे.

वाद सुरू असताना झोटा यांनी दुकानदाराला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास सांगितले. संबंधित वृद्ध व्यक्तीने दुकानातून औषधे घेतली होती का, असा प्रश्न दुकानदाराने विचारल्यानंतर झोटा यांनी त्यासंदर्भातील रेकॉर्डिंग असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना पोलिसांना बोलावण्यास आणि आणखी लोकांना घटनास्थळी जमवण्यासही सांगितले. जवळपास चार मिनिटे दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू होता. त्यानंतर दुकानदाराने गोळीबार केल्याचा आरोप आहे. गोळी लागून झोटा यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मोबाइल फोन जमिनीवर पडल्याने फेसबुक लाइव्ह थांबले.

अनेक वर्षांपासून नशाविरोधी मोहिमेत सक्रिय

परविंदर सिंह झोटा हे मानसा आणि आसपासच्या परिसरात अनेक वर्षांपासून अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात काम करत होते. काही मेडिकल स्टोअरमधून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची कथित अवैध विक्री होत असल्याचा आरोप करत ते संबंधित दुकानदारांना जाब विचारत असत. या घटनांचे व्हिडिओ ते सोशल मीडियावर प्रसारित करत असल्याने त्यांची ओळख वाढली होती. फेसबुकवर त्यांचे २४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.

झोटा हे काही दिवसांपूर्वीही सोशल मीडियावर चर्चेत आले होते. त्यांनी मानसा परिसरातील सिंथेटिक ड्रग्जच्या विक्रीवर कारवाई करण्यासाठी सीबीआयने येथे यावे, असे आवाहन करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता.

यापूर्वी २०२३ मध्येही एका मेडिकल स्टोअरच्या मालकाशी झालेल्या वादामुळे झोटा चर्चेत आले होते. त्या वर्षी १२ जुलै रोजी झोटा आणि त्यांच्या काही समर्थकांचा दुकानदाराशी वाद झाल्याचे वृत्त होते. या प्रकरणानंतर पोलिसांनी झोटा आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते. मारहाण, बेकायदा प्रवेश आणि दंगल घडवण्याच्या आरोपांखाली जुलै २०२३ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांची सुटका झाली होती.

झोटा यांच्या हत्येवरून पंजाब सरकारला विरोधकांचा घेराव

या हत्येनंतर पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजप, काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली. सरकारच्या ‘युद्ध नशियां विरुद्ध’ या अमली पदार्थविरोधी मोहिमेच्या प्रभावीपणावरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले.

भाजपचे नेते सुनील जाखड यांनी या घटनेमुळे राज्य सरकारच्या नशाविरोधी मोहिमेतील त्रुटी समोर आल्याचा आरोप केला. मेडिकल स्टोअरमधून औषधांची बेकायदा विक्री रोखण्याची जबाबदारी औषध निरीक्षकांची नाही का, असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी झोटा यांच्या हत्येसाठी पंजाबमधील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि सरकारची नशाविरोधी मोहीम अपयशी ठरल्याचा आरोप केला. झोटा यांनी राज्यातील अमली पदार्थांच्या समस्येविरोधात आवाज उठवला; मात्र आम आदमी पक्षाच्या सरकारकडून त्यांच्या प्रयत्नांना आवश्यक पाठिंबा मिळाला नाही, असे वडिंग यांनी म्हटले.

शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांनीही सरकारला धारेवर धरले. पंजाबमधील औषधांद्वारे होणाऱ्या नशेची समस्या वाढत असल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कबुली दिल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत त्यांनी सरकारने आतापर्यंत कोणती ठोस पावले उचलली, असा प्रश्न विचारला. बेकायदा नशेच्या औषधांचा किती साठा जप्त करण्यात आला, तसेच अशा विक्रीला आळा घालण्यात औषध निरीक्षकांची जबाबदारी निश्चित झाली आहे का, याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण मागितले.

या प्रकरणावर आम आदमी पक्षाच्या नेत्यांची तातडीची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, आरोपी अश्वनी कुमार याच्याविरोधात यापूर्वीही अनेक पोलीस प्रकरणे असल्याचे वृत्त आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून, या हत्येमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील अमली पदार्थांची समस्या आणि कथित अवैध औषधविक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.