२३ लाख रुपये केले होल्ड; परभणीतील निवृत्त प्राध्यापकाला घातला होता गंडा
परभणी (Parbhani Digital Arrest Case) : येथील एका निवृत्त प्राध्यापकाला डिजीटल अरेस्ट करुन मनी लाँड्रींगची भिती दाखवत १ कोटी ११ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. सदर प्रकरणात परभणी पोलीस आणि सायबरने सखोल तपास करत टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी २३ लाख रुपये यशस्वीरित्या होल्ड केले असून गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण करत विविध बँक खात्यांच्या साखळीचा अभ्यास करण्यात आला. तपासा दरम्यान देशातील विविध राज्यात पसरलेल्या व आंतरराज्यीय टोळीतील सुत्रधारांना निष्पन्न करण्यात आले. तपासात नवी मुंबई तळोजा येथील एक महिला, आफताब अब्दुल पठाण रा. शिरवळ जि. सातारा, तौफिक उर्फ बिल्ला इनायतउल्ला पटेल रा. कराड जि. सातारा, गुरप्रीतसिंग जगजितसिंग रा. मोहाली पंजाब, साहिल बालकृष्ण कटारीया रा. झिरकपुर मोहाली पंजाब यांना अटक करण्यात आली आहे. भामट्यांनी फिर्यादीला व्हॉट्स अॅप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत एनआयए, एटीएस, दिल्ली पोलीसचे अधिकारी असल्याचे भासविले. १ कोटी ११ हजार रुपये घेत फसवणूक केली.
या (Parbhani Digital Arrest Case) प्रकरणात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सतीश डोंकलवार, पोउपनि. शाकिर शेख, दामिनी ननवरे, बालाजी किरवले, पोलीस अंमलदार बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, निलेश जाधव, स्वप्नील पोतदार, शारेक मोहम्मद, हिना सय्यद, सोपान बारवकर, रजवी हुसैन, किशोर हिंगोले यांच्या पथकाने केली.
तपासात आरोपींजवळून विविध बँकांचे १९ एटीएम, डेबिट कार्ड, १ क्रेडिट कार्ड, ३ कार्पोरेट कार्ड, बँक खात्याशी संलग्न १८ सिमकार्ड, १० मोबाईल, रोख ३३ हजार रुपये असा एकूण ५ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यात विविध बँक अकाउंट मधील २३ लाख रुपयांची रोकडही गोठवण्यात आली आहे.