पोहे टाकळी शिवारातील घटना; मयत दोघे मध्यप्रदेशातील
परभणी (Parbhani Bus-Bike Accident) : पाथरी तालुक्यातील राज्य महामार्ग क्र.६१ वर पोहेटाकळी शिवारात झालेल्या बस-दुचाकीच्या भिषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मयत दोघे मध्यप्रदेशातील रहिवाशी आहेत. ऊस वाहनाला ओव्हरटेक करतांना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदरची घटना बुधवार २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली.
या (Parbhani Bus-Bike Accident) अपघाताविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, कुलदीप शिसोदिया वय - २६ आणि अनारसिंग चव्हाण वय - ५० दोघेही रा.मध्यप्रदेश हे दुचाकी क्र.एमपी ६८ एमजी ३३३५ या गाडीवरून पोहेटाकळी येथे जात होते. ते या परिसरातील एका शेतकर्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते. बुधवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पोहे टाकळी पाटीपासून सुमारे ५०० मिटर अंतरावर त्यांच्या दुचाकीची पाथरीच्या दिशेने येणार्या एमएच २० बीएल ३५०१ क्रमांकाच्या बसशी समोरासमोर धडक झाली.
बस ऊस वाहनाला ओव्हरटेक करत असतांना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोनि.लक्ष्मण केंद्रे, सपोनि.बालाजी गायकवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह पाथरी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. सदर प्रकरणी पोलिस पुढील कारवाई करत आहेत.