मानवत शहरातील गरुड चौकामधील घटना; सात जणांसह इतरांवर गुन्हा दाखल
मानवत (Parbhani Assault Case) : शहरातील गरुड चौक परिसरात जुन्या वादातून बंदुकीचा धाक दाखवून तलवार, कुर्हाडीचा दांडा आणि लाथाबुक्क्यांनी दोघांना मारहाण करून जखमी केल्याची गंभीर घटना २२ ऑक्टोबर रोजी घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मानवत पोलिसांनी सात नामनिर्दिष्ट व्यक्तींसह इतरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याच शहरातील दुसर्या एका कथित मारहाण प्रकरणात अवघ्या २४ तासांत अटकेची कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील संशयितांवर पोलिस कधी कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, मुंजा कोंडीराम साखरे (वय ३६, रा. बिडी कारखाना परिसर, मानवत) हे वाहनचालक म्हणून काम करतात. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते गरुड चौकात मोटारसायकलजवळ थांबले असताना हसन बागवान याने त्यांना अडवून फॉर्च्युनर गाडीतून फिरण्याच्या कारणावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती येता-जाता आपल्याकडे रागाने पाहत असल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे. तक्रारीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान साखरे हे डॉ. अंकुश लाड यांची फॉर्च्युनर कार घेऊन त्यांच्या घराकडे जात होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात चारचाकी वाहन आणि सुमारे १० ते १२ मोटारसायकली रस्त्यावर उभ्या असल्याने त्यांनी आपली गाडी थांबवली. यावेळी हसन बागवान हा चारचाकी वाहनातून उतरून साखरे यांच्याकडे बंदूक रोखत डॉ. अंकुश लाड कुठे आहेत, अशी विचारणा करू लागला. त्यांना संपवून टाकायचे असल्याचेही त्याने म्हटल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर युनूस बागवान हा तलवार घेऊन घटनास्थळी आला आणि डॉ. लाड भेटले नाहीत तर त्यांना संपवून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर बीलाल युनूस बागवान याने तलवारीने साखरे यांच्या उजव्या तळहातावर वार केल्याचा, तर अली रफीक बागवान याने कुर्हाडीच्या दांड्याने त्यांच्या उजव्या हातावर मारल्याचा आरोप आहे. रशीद बागवान व त्याच्या मुलांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले आहे.
या (Parbhani Assault Case) कथित हल्ल्यात साखरे यांचे मित्र रवी हिरालाल मुंडेल यांनाही तलवारीने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर साखरे बेशुद्ध झाल्याचे आणि शुद्धीवर आल्यानंतर आपण परभणी येथील न्यूरान हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे समजल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुंडेल यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात हसन बागवान, युनूस बागवान, बीलाल बागवान, अली बागवान, अजीज गणणी बागवान, रशीद बागवान आणि रफीक बागवान यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानवत पोलिस ठाण्यात २४ ऑक्टोबर रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अनिल उत्तमराव खिल्लारे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

एका प्रकरणात अटक; दुसर्या प्रकरणात पोलिसांची तत्परता कुठे?
कथित मारहाण प्रकरणात (Parbhani Assault Case) गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात कारवाई करत अटक केली. एका प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखविली. तर दुसर्या प्रकरणात बंदुकीचा धाक दाखविणे आणि धारदार शस्त्रांनी दोघांना जखमी केल्याचा आरोप असल्याच्या प्रकरणात पोलिसांची तत्परता कुठे आहे, असे डॉ. अंकुश लाड यांनी दै. देशोन्नतीशी बोलताना सांगितले.