Minor Girl Sexual assault: मुंबईला नातेवाईकाकडे गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मध्यंतरी मुलीची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रूग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती..
रूग्णालयात तपासणी दरम्यान गर्भवती असल्याचे उघड
हिंगोली (Minor Girl Sexual assault) : मुंबईला नातेवाईकाकडे गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मध्यंतरी मुलीची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी रूग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे दिसून आल्याने या प्रकरणात औंढा नागनाथ पोलिसात एका आरोपीवर पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी मुंंबईला तिच्या नातेवाईकाकडे सहा महिन्यापूर्वी गेली होती. सदर ठिकाणी मुक्कामी असताना मुलगी एकटी असल्याची संधी साधून एका युवकाने तिला जीवे मारण्याची व बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसानंतर सदर अल्पवयीन मुलगी परत आपल्या गावाकडे आली. काही दिवसापूर्वी तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला उपचाराकरीता रूग्णालयात नेण्यात आले.
यावेळी तपासणी दरम्यान सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुलीच्या कुटूंबीयांना मोठा धक्काच बसला. यानंतर त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने मुंबईत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मुलीसह तिच्या नातेवाईकांनी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या घटनेची रितसर तक्रार दिली. यावरून मुंबईतील गोपाळ शेळके याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटना मुंंबईत घडली असल्याने औंढा नागनाथ पोलिसांनी हा गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती दिली.