लातूरच्या सायबर पोलीस ठाण्याने केले सहा जणांना जेरबंद!
आरोपी मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणातील; ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी!
लातूर (Latur Cyber Police) : आम्ही एटीएसचे अधिकारी आहोत, ईडीचे अधिकारी आहोत, पोलीस अधिकारी आहोत, असे सांगत 'तुमचा १२२ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असून दहशतवाद्यांशी संबंध आहे. यात तुम्हाला अटक, कारावास होईल. तुमची बदनामी होईल. आरबीआयच्या निर्देशानुसार तुमच्या बँक खात्यातील रक्कम पडताळणीसाठी हस्तांतरित करावी लागेल, असे सांगून इडीच्या बनावट पत्राचा आधार घेण्यात आला... आणि लातूर येथील ६६ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याच्या विविध बँक खात्यांमध्ये असलेले एकूण २८ लाख ५१ हजार ९९९ रुपये हस्तांतरित करून घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणा लातूर पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करीत मध्यप्रदेश, दिल्ली आणि हरियाणातील सहा आरोपींना जेरबंद केले.
निवृत्त कर्मचाऱ्यास या आरोपींनी पोलीस अधिकारी, एटीएस आणि इडीचे अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधला. फिर्यादी यांचा १२२ कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असून दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे खोटे सांगण्यात आले. अटक, कारावास आणि बदनामीची भीती दाखवून त्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार बँक खात्यातील रक्कम पडताळणीसाठी हस्तांतरित करावी लागेल, असे सांगून इडीच्या बनावट पत्राचा आधार घेतला. या खोट्या आश्वासनाला व धमकीला बळी पडून फिर्यादीच्या विविध बँक खात्यातील २८ लाख ५१ हजार ९९९ रुपये हस्तांतरित करून फसवणूक केली.
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आलेल्या या प्रकरणानंतर लातूरच्या सायबर पोलीस ठाण्याने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचने व निर्देशांवर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात कारवाई केली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि अशोक उजगिरे, पोलीस अमलदार विकास नळेगावकर, गफार मिर्झा , विजय खारटमोल , अविनाश मरलापल्ले, रवि जाधव,सुमित कदम, कोंडिबा दंडीमे, अमर सरवदे यांनी तांत्रिक तपास व आर्थिक व्यवहारांच्या आधारे आरोपींना जेरबंद केले त्यात अमित शिवनारायण दुबे, वय ४० वर्षे, रा. महावीर कॉलनी, कटनी, मध्यप्रदेश, अनुराग गणेशदत्ता मिश्रा, वय २७ वर्षे, रा. मंगलनगर, पयारी सिमेंट दुकानाजवळ, कटनी, मध्यप्रदेश, शिवम माधवसिंह ठाकूर, वय २४ वर्षे, रा. नेनपूर, जिल्हा मंडला, मध्यप्रदेश, अंकित मानसिंग यादव, वय ३२ वर्षे, रा. नवीन दिल्ली, कुनालसिंग नरेंद्रसिंग रावत, वय ३० वर्षे, रा. रविदास वस्ती, दिल्ली आणि शिवकुमार नरेंद्रसिंग, वय ३० वर्षे, रा. भारत पीजी सेक्टर ४५, गुरुग्राम, हरियाणा यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सायबर पोलीस ठाणे, लातूर येथे गुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी!
अटक आरोपींना १ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्रमांक ४, लातूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. आर्थिक व्यवहारांची साखळी, फसवणुकीची रक्कम कोणत्या खात्यांत वळविण्यात आली, अन्य आरोपींचा सहभाग आणि गुन्ह्यात वापरलेल्या बँक खात्यांची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. मा. न्यायालयाने आरोपींना ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील हे करीत आहेत.