लोखंडी टॉमीने हल्ला केल्याचा आरोप; गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला घेतले ताब्यात
खापरखेडा (Khaparkheda Murder Case) : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुळखेडा-चिचोली ग्रामपंचायत परिसरात गुरुवारी सकाळी कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात धर्मेंद्र कापसे (वय ५९) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा मुलगा अंकित धर्मेंद्र कापसे (वय ३०) याला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
धर्मेंद्र कापसे हे बाबुळखेडा-चिचोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अंकितला दारूचे व्यसन असल्याने त्यावरून त्याचे आई-वडिलांसोबत वारंवार वाद होत होते. त्याच्या व्यसनामुळे पत्नीही त्याच्यापासून वेगळी होऊन माहेरी गेल्याची माहिती समोर आली आहे.
शेतीचे काम नसल्याने धर्मेंद्र कापसे आणि त्यांची पत्नी काही काळ त्यांच्या माहेरी पारडी येथे गेले होते. (Khaparkheda Murder Case) बुधवारी दुपारी दोघेही चिचोली येथील घरी परतले होते. धर्मेंद्र कापसे यांची प्रकृती ठीक नसून त्यांना चालण्यासही त्रास होत असल्याचे सांगण्यात येते.
दारूच्या व्यसनावरून वाद
गुरुवारी सकाळी धर्मेंद्र कापसे हे शेजारी निलकंठ राऊत यांच्या घराच्या अंगणात खुर्चीवर बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा अंकित तेथे आला. दारूच्या व्यसनाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर अंकितने वडिलांना मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यानंतर अंकित घरी गेला आणि तेथून लोखंडी टॉमी घेऊन पुन्हा घटनास्थळी आला. त्याने वडिलांवर लोखंडी टॉमीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात धर्मेंद्र कापसे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी पसार
हल्ल्यानंतर अंकित घटनास्थळावरून निघून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटलांनी खापरखेडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच खापरखेडा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनेची माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक ६ आणि युनिट क्रमांक ३च्या पथकांनाही देण्यात आली. (Khaparkheda Murder Case) आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनचा आधार घेतला. गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकांनी समन्वय साधून कारवाई करत अंकित कापसे याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.
डीसीपींकडून घटनास्थळाची पाहणी
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन डीसीपी रमेश धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, हल्ल्यामागील नेमके कारण, घटनेचा संपूर्ण क्रम आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहेत.