Illegal business Action: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे जिल्ह्यातील अवैध दारू, मटका, वाळू तस्करी आणि जुगारावर कारवाईचा धडाका सुरू
तेराही पोलीस ठाणे कृतीत, स्थानिक गुन्हे शाखा मात्र मागे
हिंगोली (Illegal business Action : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे जिल्ह्यातील अवैध दारू, मटका, वाळू तस्करी आणि जुगारावर कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. त्यांच्याच आदेशानंतर जिल्ह्यातील तेराही पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री-अपरात्री छापे टाकून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.
हिंगोली शहर, कुरुंदा, औंढा नागनाथ, कळमनुरी, आखाडा बाळापूर यासह ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांनी गेल्या 15 दिवसांत धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. कुरुंदा पोलिसांनी वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर जप्त केले. औंढा नागनाथमध्ये अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून 1.20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कळमनुरीत मटका चालकाला अटक झाली तर आखाडा बाळापूरमध्ये जुगाराचा अड्डा उध्वस्त करण्यात आला. हिंगोली शहर पोलिसांनीही शहरातील संशयित ठिकाणांवर धाडी मारून कारवाईला वेग दिला आहे.
एसपी डॉ. लोढा यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मैदानी पातळीवरील पोलीस यंत्रणा कामाला लागली असली, तरी जिल्ह्याची "मुख्य तपास यंत्रणा" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी मात्र समाधानकारक नाही. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे बडे रॅकेट शोधून त्याचा छडा लावणे आणि इतर ठाण्यांना गोपनीय माहिती पुरवणे हे एलसीबीचे मुख्य काम आहे. मात्र सध्या एलसीबीला अवैध धंद्यांचा ठावठिकाणाच लागेनासा झाला आहे.
एकीकडे 13 ठाणी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेला मात्र अवैध धंद्याचा ठाव ठिकाणा मिळत नसल्याने याबाबत उलट सुलट चर्चांना वेग आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. लोढा यांनी एलसीबीची स्वतंत्र बैठक घेऊन गोपनीय माहिती गोळा करण्याचे आणि समांतर कारवाईचे निर्देश दिले आहेत.