हिंगोली शहर पोलिसात तीन संचालकांस
तीन कर्मचार्यां वर गुन्हे दाखल
अधिक ठेवीचे अमिष दाखविल्याने अनेकजण पडले बळी
गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
हिंगोली (Financial Fraud in Hingoli) : शहरातील नवा मोंढा भागातील हिंगोली अर्बन निधी लि. कंपनीमध्ये ठेवीदारांना अधिक रकमेचे व विम्याचे आमिष दाखून त्या आमिषाला बळी पडल्याने या कंपनीत गुंतवणूक केलेल्या ६७ ठेवीदारांच्या १ कोटी ६९ लाख १५ हजार ४९३ रुपयाची आर्थिक फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसात तीन संचालकांसह एकुण ६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील नवा मोंढा भागामध्ये जयेश उत्तमराव खर्जुले यांनी हिंगोली अर्बन निधी लिमीटेड कंपनी स्थापन केली होती. ज्यामध्ये गुंतवणुक करणार्या ठेवीदारांना १२ टक्के व्याजदर देण्याचे तसेच ३ लाख रुपयापर्यंतच्या गुंतवणूकीला सुरक्षेचे विमा कवच असल्याचे आमिष दाखविल्याने त्या आमिषाला अनेक खातेदार बळी पडले. ज्यामध्ये १३ मे २०२० ते मार्च २०२४ या दरम्यानच्या कालावधीत वैभव नंदकिशोर फटाले या सोलार व्यापार्यासह त्याची आई, वडील, भाऊ, बहिण, पत्नी यांच्या नावाने एकुण १४ लाख २६ हजार ७७१ रुपये व एमआयएस डिपॉझिट आणि फिस्क डिपॉझिट योजनेमध्ये गुंतवले.
तसेच या कंपनीच्या संचालक मंडळासह कर्मचार्यांनी आपसामध्ये कट रचून वित्तीय संस्था (बँकर) म्हणुन वैभव फटाले यांची ठेव विश्वासाने घेऊन ठेवीच्या रक्कमेचा अपहार करून कंपनीचे कार्यालय मार्च २०२४ पासून बंद केले. या कंपनीमधील ठेवीच्या मुदती संपल्यानंतरही वैभव फटाले यांना मुदत संपलेल्या रक्कमा परत न देता त्यांची १४ लाख २५ हजार ७७१ रूपयाची व त्यांच्या परिचयातील ६१ ठेवीदारांच्या १ कोटी ५४ लाख ८९ हजार ७२२ रुपयाची अशी एकुण १ कोटी ६९ लाख १५ हजार ४९३ रुपयाच्या रकमेची आर्थिक फसवणुक केली. यामध्ये कंपनीच्या ग्राहकांनी या संदर्भात गुन्हा दाखल करावा अशी मागणी जवळपास ३० महिन्यांपासून केली जात होती. त्यानंतर आता कुठे या ग्राहकांच्या लढ्याला यश मिळाले.
या (Financial Fraud in Hingoli) संदर्भात १ नोव्हेंबर रोजी हिंगोली शहर पोलिसात वैभव नंदकिशोर फटाले रा. साई नगर नांदेड रोड हिंगोली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली अर्बन निधी लि. कंपनी कार्यालयाचे संचालक जयेश उत्तमराव खर्जुले रा. एनटीसी हिंगोली, संचालक संतोष नारायण धुडगेकर रा. बेलुरा जि. यवतमाळ, संचालक सौ. रोहीणी जयेश खर्जुले रा. एनटीसी हिंगोली, कर्मचारी दिनेश नारायण आणेकर रा. एनटीसी हिंगोली, मोनाली बजरंगराव आंबेकर, अजिंक्य अंबादास खर्जुले रा. रिसाला बाजार हिंगोली या सहा जणांवर फसवणुकीसह एमपीआयडी अॅक्ट यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात अला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.एस. शेकडे हे करीत आहेत.
ग्राहकांनी अनेकवेळा उपोषण व दिले निवेदन
हिंगोली अर्बन निधी लि. कंपनी कार्यालयात गुंतवणुक केलेल्या ठेवीदारांची फसणुक झाल्यानंतर मार्च २०२४ नंतर ही कंपनी बंद करण्यात आली. तेंव्हापासून गुंतवणुक दारांनी या संदर्भात सहकार विभागासह शासन स्तरावर, जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाकडे निवेदन देऊन या प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे गुंतवणुकदारांनी उपोषण देखील केले होते.या संदर्भात २७ ऑक्टोंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा दिला होता.त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.
गुन्ह्यातील मुख्य आरोपी सध्या परभणी कारागृहात
यापूर्वी हिंगोली महिला अर्बन पतसंस्थेमध्ये अशाच पध्दतीचा संचालक मंडळासह कर्मचार्यांनी अपहार केला होता. ज्यामध्ये (Financial Fraud in Hingoli) हिंगोली शहर पोलिसात या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये मुख्य आरोपी संचालक जयेश उत्तम खर्जुले व त्यांच्या पत्नी सौ. रोहीणी जयेश खर्जुले या दोघांचाही समावेश आहे. या दोघांनाही पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने परभणी कारागृहात होते. यातील रोहीनी खर्जुले यांची मागील एक महिन्यापूर्वी जामिनावर मुक्तता झाली होती. तर त्यांचे पती जयेश खर्जुले हे अद्यापही परभणी कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.