चिखली येथील प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीस ४ हजार रुपये दंड
चिखली (Chikhli woman molestation case) : घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी समाधान सुरेश गळकर यास बुलढाणा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अकबर शेख जाफर शेख यांनी दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावास व ४ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
दि. १२ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री सुमारे १० वाजता ही घटना घडली होती. पीडित महिला वय ३० वर्षे, रा. खैरव, ता. चिखली, ही पतीपासून मागील सात-आठ वर्षांपासून विभक्त असल्याने आपल्या आईकडे राहत होती. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ मजुरीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता, तर आई नागपूर येथे बहिणीकडे गेली होती. त्यामुळे पीडित महिला घरात एकटीच होती.
यावेळी आरोपी समाधान गळकर हा रात्री तिच्या घरात आला. पीडितेने आई घरी नसल्याचे सांगून त्याला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करत तिला मारहाण केली. त्यानंतर त्याने जबरदस्तीने तिचा हात धरून घरातील कोठडीत ओढत नेले. पीडितेने आरडाओरड केल्याने आरोपी तेथून पळून गेला. घटनेनंतर पीडितेने नातेवाईकांना माहिती देत पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला. तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा, साक्षीदारांचे जबाब तसेच पीडितेच्या भावाचे व इतर पुरावे संकलित करण्यात आले. त्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. वसंत लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने उपलब्ध पुरावे व साक्षी तपासून आरोपीस दोषी ठरविले. त्यानुसार भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांन्वये आरोपीस तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व ४ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली.
सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. वसंत भटकर यांनी काम पाहिले. तपासात पोलीस अधिकारी पांडुरंग शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी काम पाहिले, तर कोर्ट पैरवी म्हणून नंदाराम इंगळे यांनी सहकार्य केले.