पोलीस डीबी पथकाची कामगिरी; फरार आरोपींच्या शोधमोहीमेला यश
चिखली (Chikhali Police Action) : बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने फरार व विविध गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिखली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने (डीबी पथक) गुजरात राज्यातील मोरबी जिल्ह्यातील वाकानेर येथून एका पाहिजे आरोपीला अटक केली आहे. मुस्ताकभाई उस्मानभाई कडीवार (वय ४०, रा. लिंबाडा, ता. वाकानेर, जि. मोरबी, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात होता पाहिजे
चिखली पोलीस ठाण्यात २३ जानेवारी २०२५ रोजी अपराध क्रमांक ७९/२०२५ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२० व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीला यापूर्वी अटक करण्यात आली होती, तर दुसऱ्या आरोपीला पंढरकवढा येथून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, तिसरा आरोपी मुस्ताकभाई कडीवार हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
या (Chikhali Police Action) आरोपीचा शोध घेण्यासाठी चिखली पोलिसांचे गुन्हे शोध पथक सातत्याने प्रयत्नशील होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. जिल्हा पोलीस दलाच्या फरार व पाहिजे आरोपी शोधमोहीमेदरम्यान गुजरातमधील वाकानेर येथून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या आदेशानुसार, चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत धंदर, अजय इटावा, राहुल पायघन आणि ज्ञानेश्वर शिंदे यांचा सहभाग होता.
गुजरात राज्यात जाऊन फरार आरोपीला अटक करण्याच्या या कामगिरीमुळे चिखली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे.