स्थागुशा, नानलपेठ पोलीसांची संयुक्त कारवाई
तीन आरोपी ताब्यात; तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
परभणी (ATM hard disk theft) : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन एटीएममधून हार्ड डिस्क काढून चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन नानलपेठ यांनी गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी संयुक्त कारवाई करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ३ लाख,२ हजार, १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील भिकुलाल पेट्रोल पंपाजवळील, क्रांती चौक येथील आणि सुपर मार्केट रोडवरील महात्मा फुले कॉलनीजवळील अशा तीन एसबीआय एटीएममधून हार्ड डिस्क काढून चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन नानलपेठ यांनी तत्काळ कारवाई करून दोन तासांत गुन्ह्यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपी सचिन उदय यादव वय २३ वर्षे, प्रफुल्ल शंकर सोनवणे, वय २२ वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ जालना, विशाल धाकतोडे, वय २० वर्षे, रा. मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून स्कायव्हॉक कंपनीच्या ४ टीबी क्षमतेच्या तीन हार्ड डिस्क किंमत १ लाख,३५ हजार,बुलेट मोटारसायकल किंमत १ लाख ५० हजार, मोबाईल फोन व सिम किंमत १० हजार, सिम नसलेला फोन किंमत ७ हजार रुपये, दोन स्क्रूड्रायव्हर किंमत १०० रुपये, काळ्या रंगाची बॅग असा एकूण ३ लाख,२ हजार,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलीस स्टेशन नानलपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थागुशा गजेंद्र सरोदे, पोलीस निरीक्षक नानलपेठ पोलीस स्टेशन विलास घोबाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या (ATM hard disk theft) कारवाईत सपोनि सय्यद, पोउपनि गणेश सवंडकर, पोह महेश पांगरकर,नेताजी गित्ते, पोशि प्रमोद पुरी, पोह ईशाद शेख, पोना संतोष सानप, पोशि विनोद चव्हाण सहभागी होते.