स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; बनावट नोटा देवून फसवणुकीची तयारी
परभणी (Local Crime Branch Action) : जिंतूर रोडवरील पाथरी बायपास जवळ काही इसम तोंडाला पांढरा रुमाल बांधून हातात तलवार, लोखंडी रॉड घेऊन दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरुन पोलिसांनी कारवाई करत सदर इसमांना ताब्यात घेतले. आंतरजिल्हा टोळीला पकडण्यात आले असून त्यांच्या जवळून ४ लाख ५७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार २६ ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास करण्यात आली. सदर प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोनि. गजेंद्र सरोदे, सपोनि. रामेश्वर धोंडगे, पोलीस अंमलदार महेश कौठाळे, राहुल परसोडे, सचिन भदर्गे, माणिक वाघ, सिध्देश्वर चाटे, नामदेव डुबे, निलपत्रेवार, राम पौळ, माहुरे, महारुद्र सपकाळ, इमरान यांच्या पथकाने कारवाई केली. धर्मापुरी शिवारातील जिंतूर ते पाथरी बायपास रोडवर सोमवारी रात्री सापळा रचत एक चारचाकी ताब्यात घेण्यात आली.
तसेच गजानन तुळशीराम इंगळे, केशव अभ्याजी सरोदे, किशोर वामन कांबळे, पवन ओमप्रकाश चौधरी, योगेश पद्माकर भोज यांना पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी बायपास रोडवरुन ये - जा करणार्या वाहनांना आडवून लूटमार करण्याचा व शहरात घरफोडी करण्याचा उद्देश असलेल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या जवळ खेळण्यातील नोटा आढळून आल्या. त्या देवून फसवणूक करण्याचा उद्देश होता. सदर इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.