बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBIने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या JMGS-I आणि MMGS-II पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 1.93 लाखांपर्यंत वेतनाची संधी
बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBIने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. बँकेकडून स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या ट्रेड फायनान्स ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती नियमित स्वरूपाची असून, इच्छुक उमेदवारांना SBIच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 29 ऑगस्टपासून सुरू झाली आहे.
कोणत्या पदांसाठी भरती?
SBIकडून ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या दोन श्रेणींमध्ये भरती केली जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ व्यवस्थापन श्रेणी JMGS-I आणि मध्यम व्यवस्थापन श्रेणी MMGS-II या पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
JMGS-I मधील ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा IIBFकडील फॉरेक्स ऑपरेशन्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र 31 जुलै 2026 रोजी किंवा त्यापूर्वी मिळालेले असावे.
याशिवाय ICC अकादमीचे ग्लोबल ट्रेड प्रमाणपत्र, LIBFचे इंटरनॅशनल ट्रेड फायनान्स (CITF) प्रमाणपत्र किंवा IIBFचे इंटरनॅशनल ट्रेड प्रमाणपत्र यापैकी आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे. तसेच ट्रेड फायनान्स प्रोसेसिंग आणि ऑपरेशन्स क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे.
MMGS-II पदासाठीही शैक्षणिक पात्रता समान असून, या पदासाठी संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयाची अट काय?
JMGS-I पदासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. तर MMGS-II पदासाठी किमान वय 23 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. वयाची गणना 31 जुलै 2026 या तारखेच्या आधारे केली जाणार आहे.
नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 3 ते 15 वर्षांपर्यंतची सूट मिळणार आहे.
पगार किती मिळणार?
SBIमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनासोबत विविध भत्ते आणि सुविधांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), शहर नुकसानभरपाई भत्ता (CCA), भविष्य निर्वाह निधी, अंशदायी निवृत्तीवेतन निधी, NPS, रजा प्रवास सवलत (LFC), वैद्यकीय सुविधा आणि इतर भत्त्यांचा समावेश आहे.
- JMGS-I: 48,480 ते 1,85,920 रुपये
- MMGS-II: 64,820 ते 1,93,960 रुपये
परीक्षा न देता होणार निवड
या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. बँकेच्या शॉर्टलिस्टिंग समितीने निश्चित केलेल्या निकषांनुसार अर्जांची छाननी केली जाईल. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
मुलाखत 100 गुणांची असणार असून, त्यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांची ट्रेड फायनान्स ऑफिसर पदावर निवड केली जाईल.