Patur NEET Exam: पातूर येथील शाहबाबू ज्युनिअर कॉलेजमध्ये 280 विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली. येथे शांततापूर्ण व सुव्यवस्थित वातावरणात परीक्षा पार पडली, याची निवड उत्कृष्ट सुविधांमुळे झाली.
पातूरमध्ये प्रथमच NEET परीक्षा केंद्र
पातूर (Patur NEET Exam) : राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) यावर्षी पातूर येथील शाहबाबू ज्युनिअर कॉलेजमध्ये शांततापूर्ण व सुव्यवस्थित वातावरणात पार पडली. या परीक्षेत एकूण 280 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या स्वप्नांकडे पाऊल टाकले. NEET (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) ही देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS, BDS तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत आयोजित केली जाते.
परीक्षा केंद्र निवडीसाठी पातूर शहरातील विविध शाळांचा सर्वेक्षण करण्यात आला होता. मात्र शाहबाबू ज्युनिअर कॉलेजमध्ये उपलब्ध उत्कृष्ट भौतिक सुविधा, पुरेशी वर्गखोली व्यवस्था, सुरक्षा व इतर आवश्यक सोयी लक्षात घेता या महाविद्यालयाची NEET परीक्षा केंद्र (Patur NEET Exam) म्हणून निवड करण्यात आली. पातूर तालुक्याला प्रथमच NEETसारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय परीक्षेचे केंद्र मिळणे हे संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी अत्यंत शांत, शिस्तबद्ध व निर्भय वातावरणात परीक्षा दिली. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांसाठीही आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व पालकांनी शाहबाबू ज्युनिअर कॉलेजला मिळालेल्या या संधीबद्दल आनंद व्यक्त करत, पातूरच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही एक महत्त्वाची उपलब्धी असल्याचे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य मुजीबउल्ला खान हे केंद्रप्रमुख होते व कामरुज़्ज़मा खान उप केंद्रप्रमुख होते, तर डॉ. सी. बी. कडू यांनी केंद्र पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.