PSI Digambar More: महाराष्ट्रातील मोहजा इंगोले येथील दिगंबर मोरे यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. शिवसेनेने त्यांचा सत्कार केला आणि गावात आनंदोत्सव साजरा केला.
रिसोड (PSI Digambar More) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात रिसोड तालुक्यातील मोहजा इंगोले येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील दिगंबर मोरे यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रिसोड तालुका समन्वयक घनश्याम मापारी यांनी दिगंबर मोरे (PSI Digambar More) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दिगंबर मोरे हे सध्या वाशिम पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे धाकटे बंधू नंदू मोरे हे देखील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. कर्तव्य बजावत असतानाच जिद्दीच्या जोरावर दिगंबर मोरे यांनी ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
मोहजा इंगोले सारख्या छोट्याशा गावातून दिगंबर मोरे यांच्या रूपाने तिसरा (PSI Digambar More) पोलीस उपनिरीक्षक मिळाला आहे. यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, "दिगंबर मोरे यांनी गावाचे नाव रोशन करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. ग्रामीण भागातील इतर तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव लौकिक करावे," असे गौरवोद्गार घनश्याम मापारी यांनी यावेळी काढले. या सत्कार प्रसंगी जळगाव जामोद येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले (मोहजा इंगोलेचे रहिवासी) नारायण सरकटे आणि अंकुश कालापाड यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. मोरे यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.