आजच्या काळात शिक्षण व्यवस्थेचे चित्र भयावह आणि दिशाहीन झालेले दिसते. शिक्षणाकडे गांभीर्याने नव्हे तर गंमतीने अनेक लोक बघताना दिसतात. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही; हा विचार अनेक विचारवंतानी मांडलेला आहे आणि त्याची प्रचिती येत आहे. विद्यार्थ्याने दहावी/बारावीनंतर कुठे प्रवेश घ्यावा? या गोंधळात पडलेल्या पालकांच्या पुढेही हा प्रश्न 'आ' वासून उभा आहे.
शिक्षणक्षेत्रातील विविध प्रकारचे व्यावसायिक शिक्षण येत आहे. विद्यार्थ्यांचा कलही तिकडेच जास्त आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक शाखांचा विचार करता याही क्षेत्रात आजही उत्तम भविष्य नक्कीच आहे; परंतु आज विद्यार्थ्यांना शार्टकटचा मार्ग खुणावताना दिसत आहे. त्यातही अलीकडे प्रवेश घेताना विद्यार्थी म्हणतात, 'पास व्हायची गॅरण्टी आहे का?' असा प्रश्न ऐकून पायांखालची जमीन सरकते. अभ्यास न करता काही विद्यार्थी केवळ कॉपी करून पास व्हायचे. अनेकदा पालकही यात सामील होतात. 'अभ्यास नको, प्रवेश घेतो, मला फक्त पास करा. नाहीतर दुसरीकडे जाणार!!'....
शिक्षणाचे महात्म्य माहीत असूनसुद्धा आजची तरुण पिढी कुठे चाललेली आहे! हीच स्थिती पुढेही राहिली तर.....शिक्षण क्षेत्रातील भवितव्य उद्ध्वस्त करणारी ठरेल.
आपण नेमके कुठे चाललो आहोत? वैद्यकीय, इंजिनीअरिंग आदि व्यावसायिक क्षेत्राचे ठीक आहे... मार्ग सापडेल; परंतु पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये अनेकदा प्रवेश कुठे घ्यावा? याबाबत उदासीनता, अज्ञान आणि मार्गदर्शनाचा अभाव ही कारणेही महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर काहीही न करता पदवी हवी; हे चुकीचे बीज रूजविलेले आहे आणि ते अंकुरित होत आहे चुकीच्याच दिशेने. हीच स्थिती राहिली तर शिक्षणाचे वाटोळे होईल आणि विद्यार्थी दिशाहीन. या स्पर्धेच्या युगात तो टिकणारच नाही. ही काळ्या दगडावरची रेघ ठरेल.
आपले पाल्य आज चुकीच्या पद्धतीने उत्तीर्ण झाले तर पुढला काळ सोपा असेल का? स्पर्धा परीक्षेत टिकेल का? आज परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका मिळवणे, कॉपी करणे... अशा चुकीच्या घटना दर तासाला घडत आहेत. हेही त्याचेच द्योतक आहे; परंतु कुठेही प्रवेश घेण्याआधी पालकांनी शोध घ्यावा, विद्यालये-महाविद्यालये अभ्यासक्रमाबरोबर चारित्र्यसंपन्न, समाजहिताचे शिक्षण देत आहे का? विद्यार्थ्यांना नीट दिशा दाखविण्याचे काम संस्था करते का? ह्या सार्या गोष्टी तपासून मगच आपल्या पाल्यांनी प्रवेश घ्यावा. शेवटी पाल्याचे भविष्य हे शिक्षणावरच अवलंबून आहे हे विसरता कामा नये.
आज गल्लीबोळात शिक्षणाचे दुकान लागलेले आहे. विद्यार्थ्यांना अनेक खोटेनाटे आश्वासन देऊन आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी चढाओढ लागलेली आहे. तिथे इमारत नाही, वर्ग खोल्या नाही, ग्रंथालय नाही, प्रयोगशाळा नाही, खेळाचे मैदान नाही, शिक्षित प्राध्यापक नाही, कुठलीही सुविधा नसताना केवळ सरकारकडून विद्यार्थ्याप्रत संस्था मालकाला पैसे मिळतात. त्याच्यातील काही पैसे प्रवेशित विद्यार्थ्यांना देऊन बाकीचे पैशांनी स्वतःची तुंबडी भरणारे संस्था मालक आजूबाजूला दिसत आहे. इथे नक्कीच विद्यार्थ्यांची फसवणूक होते. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. पालकांनी हे जाणून घ्यावे व जिथे नियमितपणे शिक्षण दिल्या जाते, जिथे ग्रंथालय आहे, प्रयोगशाळा आहे, बाकी सर्व सुविधा आहे, उच्चशिक्षित आणि कायमस्वरूपी प्राध्यापक शिकवण्यासाठी आहे. तिथेच आपल्या पाल्यांनी प्रवेश घ्यावा.
आज अनेक नामांकित महाविद्यालये गरीब, होतकरू विद्यार्थ्यांठी नाममात्र शुल्क घेऊन उत्तम शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. तिथे हवी विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्य, अभ्यास आणि आयुष्यातील ठरलेले थ्येय, पण आज झटपट आणि पटकन सगळे हवे. ही मानसिकता वाळवीसारखी शिक्षणक्षेत्राला पोखरून काढत आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून शिक्षण व्यवस्था चालत आहे. गुरू आणि शिष्य यांचे पवित्र नाते जपले जात होते. आज स्थिती बदललेली आहे. प्रवेश घ्यायचा, पण अंगाला धक्का लागला नाही पाहिजे, आम्ही प्रवेश घेतो मात्र पास तुम्हाला करावे लागेल अशी स्थिती झालेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.' ही ताकद बाबासाहेबांनी सर्वांना दिलेली आहे. महात्मा फुले यांनी शिक्षणामुळेच क्रांती केली. छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार आणि कर्तृत्व शिक्षणातून घडले आहे. ही मंडळी शिक्षणामुळेच आज कायम आपल्या स्मरणात आहे... आपण मात्र शॉर्टकट शोधतो हे कितपत बरोबर आहे?
सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, मदर टेरेसा, भगिनी निवेदिता, ताराबाई शिंदे, आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, किरण बेदी इत्यादी स्त्रियांनी केवळ शिक्षणामुळे आपापल्या क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे.
शिक्षण घ्यायचे म्हणजे नेमके काय करायचे? प्रवेश कुठे घ्यायचा? आणि का घ्यायचा? याचे मार्गदर्शन घेणे गरजेचेच ठरते. समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या शिक्षणक्षेत्रातील गंभीर प्रश्नावर पालक आणि पाल्यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे.
'दे हरि पलंगावरी' अशी बिकट अवस्था झालेली आहे. हा विषय हलक्यात घ्यावा असा नाही, तर आज शिक्षण क्षेत्रातील वास्तवाच्या सूक्ष्म निरीक्षणातून मनन, चिंतन करणे गरजेचे आहे.बी.ए./बी कॉम/ बी.एस्सी. या शाखांतील विद्यार्थ्यांसाठी कितीतरी नोकर्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, पण योग्य महाविद्यालयात प्रवेश घेऊन, योग्य दिशा निवडल्यास भविष्य उज्ज्वल ठरू शकते, कारण मेहनतीचा मार्गच यश खेचून आणतो.
आपल्यापुढे अनेक थोर पुरुष, विचारवंतांची उदाहरणे आहेत की, जे केवळ उत्तम शिक्षणामुळे अजरामर झालेले आहेत. आणि त्यांचे ते शिक्षणाबद्दल विचार चिरंतन आणि अक्षय ठरले आहेत. थोडक्यात, शिक्षणासारख्या गंभीर प्रश्नाकडे तात्पुरत्या स्वरूपात न बघता भविष्याचा खोलवर विचार करावा व योग्य महाविद्यालयाची निवड करून आपल्या पाल्यांना शिक्षण द्यावे हीच काळाची गरज आहे.
डॉ. विजय जाधव
राजस्थान महाविद्यालय, वाशिम.
संपर्क: ९८८१५२७६६०