नवरात्र उत्सवात महिला सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दलाचे विशेष अभियान
हिंगोली (Women's Safety Police Force) : शारदीय नवरात्र उत्सवात महिलांच्या सुरक्षिततेसाठी हिंगोली जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 'ती एकटी नाही, सण-उत्सवात प्रत्येक महिलेसाठी हिंगोली पोलीस सतर्क आहे' ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
या (Women's Safety Police Force) मोहिमेच्या अनुषंगाने महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता गोमासे यांनी जिल्ह्यातील सर्व महिलांना व तरुणींना निर्भयपणे उत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे. नवरात्र काळात जिल्ह्यात गरबा, दांडिया, सार्वजनिक देवी मंडपांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन छेडछाड करणे, अश्लील शेरेबाजी, फोटो काढणे किंवा इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. हे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने ठोस पावले उचलली आहेत. पोलीस दलाकडून नवरात्र महोत्सव दरम्यान उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
ज्यामध्ये सर्व गरबा व दांडिया स्थळांवर आणि प्रमुख देवी मंदिर परिसरात साध्या वेशातील महिला व पुरुष पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी महिला पोलीस पथकाकडून सतत पेट्रोलिंग करण्यात येत आहे. सीसीटीव्ही द्वारे गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवली जात आहे. छेडछाड करणार्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी दिले आहेत. यावेळी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता गोमासे म्हणाल्या, 'प्रत्येक महिलेने स्वतःला एकटे समजू नये. हिंगोली पोलीस २४ तास तुमच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी असुरक्षित वाटल्यास, कोणी त्रास देत असल्यास किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास घाबरू नका, तात्काळ मदत मागा.' कोणत्याही संकटाच्या वेळी महिलांनी तात्काळ डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. ११२ वर कॉल येताच काही मिनिटांत पोलीस मदत घटनास्थळी पोहोचेल, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनीही नागरिकांना आवाहन केले आहे की, उत्सवाचा आनंद घेताना महिला सुरक्षिततेचा सन्मान राखा आणि कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास पोलिसांना सहकार्य करा. या उपक्रमामुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत असून हिंगोली पोलिसांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.