ब्रह्मवाडी शिवारात वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरा तैनात
सेनगाव (Sengaon Wild Animal Attack) : तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील मांगवाडी शिवारातील आखाड्यावर अज्ञात हिंस्र वन्यप्राण्याने केलेल्या भीषण हल्ल्यात तीन गायी जागीच ठार झाल्या असून एक गाय गंभीर जखमी झाली आहे. रविवारी वारी ता. २५ रोजी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे शेतशिवारात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शेतकरी बबन खंडुजी थोरात यांच्या आखाड्यावर हा प्रकार उघडकीस आला. मृत तीन गायींच्या गळ्याचा आणि स्तनाजवळील भाग हिंस्र प्राण्याने फाडला असून एका गायीच्या गळ्यावर गंभीर जखमा आहेत. दरम्यान, शुक्रवारी ता. २३ रोजी सेनगाव-तळणी मार्गावर बिबट्या दिसल्याची चर्चा होती, त्यामुळे हा (Sengaon Wild Animal Attack) हल्ला बिबट्यानेच केल्याची शंका वर्तवली जात आहे.
पोलिसांनी व वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, या परिसरातील वन्यप्राण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने सोमवारी ता. २६ तातडीने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा बसविला आहे. आधीच दुष्काळी परिस्थितीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याचे पशुधनामुळे मोठे नुकसान झाले असून, (Sengaon Wild Animal Attack) वनविभागाने हल्लेखोर प्राण्याचा बंदोबस्त करून पीडित शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.