महापौर व आयुक्तांकडे नगरसेवक गणेश गवारे यांची मागणी
लातूर (Latur Municipal Water Scarcity) : लातूर शहरावर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट गडद होत असताना शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, उपलब्ध पाणीसाठ्याचे व्यवस्थापन आणि संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. या गंभीर विषयावर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा तातडीने बोलवावी, अशी मागणी नगरसेवक गणेश ईश्वरप्पा गवारे यांनी केली आहे.
धनेगाव धरणातील पाणीसाठ्याची स्थिती, शहराला होणारा पाणीपुरवठा आणि आगामी काळात उद्भवू शकणारी टंचाई या बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आताच नियोजन का केले जात नाही? असा सवाल उपस्थित करत गवारे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीकडे लक्ष वेधले.
शहरातील प्रत्येक प्रभागाला नियोजनबद्ध आणि समान पद्धतीने पाणी मिळावे, (Latur Municipal Water Scarcity) पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात पारदर्शकता असावी, गळती व पाण्याचा अपव्यय रोखावा, तसेच गरज पडल्यास पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन आधीच तयार ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत असल्यास संबंधित विभागांनी त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केवळ आश्वासने नकोत, ठोस कृती आराखडा हवा!
विशेष सर्वसाधारण सभेत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा, प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याचे नियोजन, पर्यायी व्यवस्था, पाणी बचतीसाठी उपाययोजना आणि संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करण्यावर चर्चा व्हावी. सभेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी वेळेत होते की नाही, यासाठी नियमित आढावा घेण्यात यावा, अशी भूमिका गवारे यांनी मांडली.
पाणी हा (Latur Municipal Water Scarcity) नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यावश्यक प्रश्न आहे. परिस्थिती गंभीर होण्याची वाट न पाहता प्रशासनाने आताच कृती करावी. नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेऊन सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी गणेश ईश्वरप्पा गवारे यांनी केली.