पाणी हक्क संघर्ष समिती धरणे आंदोलन

शेनोडी-रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता द्या; अन्यथा इसापूरच्या उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन रोखणार!

Water Rights Struggle Committee Protest: कळमनुरी तालुक्यातील शेनोडी– रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, या मागणीसाठी पाणी हक्क संघर्ष समिती..

शेनोडी-रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता द्या; अन्यथा इसापूरच्या उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन रोखणार!

Water Rights Struggle Committee Protest

पाणी हक्क संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनातून शासनाला निर्वाणीचा इशारा

हिंगोली (Water Rights Struggle Committee Protest) : कळमनुरी तालुक्यातील शेनोडी– रामवाडी उपसा जलसिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, या मागणीसाठी पाणी हक्क संघर्ष समिती, कळमनुरीच्या वतीने 5 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने या योजनेच्या प्राथमिक सर्वेक्षणासाठी तब्बल ६३ लाख २२ हजार ५०० रुपये निधी खर्च करून सर्वेक्षण पूर्ण केले, प्रशासकीय मान्यता प्रस्ताव शासनाकडे दाखल करूनही असताना प्रशासकीय मान्यता देण्यास विलंब का? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

या (Water Rights Struggle Committee Protest) योजनेतून कळमनुरी तालुक्यातील सुमारे १,९५८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे या लाभ क्षेत्रातील बहुतांश शेतकरी आदिवासी व अल्पभूधारक असून, अवर्षणप्रवण भागातील शेतीला शाश्वत पाणी मिळण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.

१३.४२ दलघमी पाणी उपलब्धतेचे नियोजन
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत यापूर्वी मंजूर झालेल्या परंतु प्रत्यक्षात कार्यान्वित नसलेल्या उपसा सिंचन योजनांमधून ४.९२ दलघमी पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच विविध कारणांमुळे वगळण्यात येणाऱ्या एकूण १,१४८ हेक्टर सिंचन क्षेत्रातून ८.५० दलघमी पाणी उपलब्ध होण्याचे नियोजन आहे. यामध्ये चालगणी शाखा कालवा ४३.८२ हेक्टर, चिंचाळा वितरिका २२४.१५ हेक्टर, धर्माबाद शाखा कालव्यांतर्गत शहरीकरणामुळे वगळण्यात येणारे क्षेत्र ५७९.४७ हेक्टर आणि कायाधू पूरक कालव्याचे ३०० हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे.

अशा प्रकारे पूर्वीच्या मंजूर योजनांमधून उपलब्ध होणारे ४.९२ दलघमी आणि वगळण्यात येणाऱ्या सिंचन क्षेत्रातून उपलब्ध होणारे ८.५० दलघमी असे एकूण १३.४२ दलघमी पाणी शेनोडी– रामवाडी योजनेसाठी उपलब्ध होऊ शकते. या पाण्याच्या आधारे १,९५८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची मागणी समितीने केली आहे.
  
  या योजनेच्या प्राथमिक संरेखन सर्वेक्षणाच्या अंदाजपत्रकाला  २९ एप्रिल २०२५ रोजी मुख्य अभियंता तथा मुख्य प्रशासक, लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी मान्यता दिली होती. त्यानंतर २३ जुलै २०२५ रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी सर्वेक्षणाची निविदा काढण्यास मान्यता दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्यात आला आणि शासनाकडून रु. ६३,२२,५००/- निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले.

मात्र, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग, पथक क्रमांक ४, आखाडा बाळापूर यांनी समितीला दिलेल्या पत्रात शासन स्तरावर पाणी उपलब्धतेची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे कळविले आहे. यावर समितीने प्रश्न उपस्थित केला आहे की, पाणी उपलब्ध बाबत निश्चितता नसताना  सर्वेक्षणाला मान्यता कशी देण्यात आली? ६३ लाखांहून अधिक निधी खर्च करून सर्वेक्षण कशाच्या आधारे पूर्ण करण्यात आले? आता पुन्हा पाणी उपलब्धतेच्या मंजुरीचे कारण पुढे करून प्रशासकीय मान्यता रोखणे ही शेतकऱ्यांची अन्यायकारक अडवणूक असल्याची भूमिका समितीने मांडली.

इसापूर धरणाच्या उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन रोखण्याचा इशारा
शेनोडी– रामवाडी योजनेमुळे (Water Rights Struggle Committee Protest) सहा गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. शेती उत्पादन, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने योजनेला तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून १ मार्च रोजी सोडण्यात येणारे पहिले उन्हाळी आवर्तन सोडू दिले जाणार नाही. तसेच योजनेला प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत उजव्या कालव्यावरून हटणार नाही, असा निर्वाणीचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

 आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन सुरू केले, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी तातडीने निरोप देऊन उ.पैं. प्र. चे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब अंदोलकांसमोर आले व निवेदन स्वीकारले.

सदरच्या आंदोलनात डॉ. अण्णासाहेब शिंदे, ॲड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, हाटेसिंग चौधरी,पाणी हक्क संघर्ष समितीचे निमंत्रक नंदकिशोर तोष्णीवाल,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, शिवाजीराव पवार,  उबाठाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती वनिता गुंजकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सतीश पाचपुते, सुरेश आप्पा सराफ, सौ पुष्पा उत्तम कुरवडे सरपंच मसोड, प्रभू भागोराव टाले सरपंच रामवाडी, राणी कानबाराव मस्के प्रशासक मुंढळ, उषा अशोक भोसले प्रशासक असोलवाडी, साहेबराव जाधव शिवनी मयूर शिंदे शिवनी भारत बोडखे रामवाडी तसेच लाभक्षेत्रातील  सरपंच, ग्रामपंचायत प्रशासक, माजी पंचायत समिती सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकऱ्यांना आश्वासन नको, प्रत्यक्ष सिंचन हवे! कागदोपत्री योजना नको, प्रत्यक्षात पाणी हवे! प्रशासकीय दिरंगाई नको, तात्काळ प्रशासकीय मान्यता हवी! असा ठाम निर्धार व्यक्त करत शासनाने या प्रश्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पाणी हक्क संघर्ष समितीने केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे यांनी जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी येत्या 17 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे चर्चेसाठी यावे असे सांगितले. 

जलसंपदा विभागाच्या वतीने प्रसाद लांब कार्यकारी अभियंता यांनी निवेदन स्वीकारले जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मसोड, रामवाडी, शिवनी, असोलवाडी, मुंढळ, शेनोडी या गावातील महिला व पुरुष शेतकरी दुचाकी व चार चाकी च्या रॅलीत येऊन या आंदोलनात सहभागी झाले मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी होत्या.