शासन निर्णय: सेनगाव तालुक्यासह ३०४ तालुक्यांत मृद व जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश
सेनगाव (Water Conservation Action Plan) : राज्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 'ट्रिगर-१' आणि 'ट्रिगर-२' लागू झालेल्या सेनगाव तालुक्यासह राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे प्राधान्याने आणि युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने २६ ऑक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाद्वारे दिले आहेत.
यंदा खरीप हंगामात पावसाने पाठ फिरविल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने विशेष सवलती व उपाययोजना जाहीर केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जलसाठे पुनरुज्जीवित करणे, पाणी अडवणे व जिरवणे यासाठी दशसूत्री कार्यक्रम राबविला जाणार आहे.
शासकीय आदेशानुसार, दुष्काळ घोषित प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे तयार केले जाणार आहेत. तसेच गावांतील जलसाठ्यांमधील गाळ काढणे, नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करणे, नादुरुस्त कोल्हापुरी पद्धतीचे (को.प.) बंधारे दुरुस्त करून नीडल बसवणे, आणि सर्व बंधाऱ्यांवर गेट/फळ्या बसवून पाणी अडवण्याची कामे केली जातील. याशिवाय शासकीय व खाजगी इमारतींवर 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' अनिवार्य स्वरूपात राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जलसंधारणाची ही सर्व कामे रोहयो (VB GRAM G), जलयुक्त शिवार २.०, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जिल्हा नियोजन समिती (DPC) निधी, खासदार-आमदार निधी, तसेच सी.एस.आर. (CSR) आणि खनिज विकास निधीतून पूर्ण केली जाणार आहेत. 'पाणी फाउंडेशन', 'नाम फाउंडेशन' आणि 'टाटा ट्रस्ट' यांसारख्या स्वयंसेवी संस्थांची मदतही यासाठी घेतली जाणार आहे.
"जलसंधारणाची (Water Conservation Action Plan) सर्व कामे करताना तांत्रिक मापदंडांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. दुरुस्तीच्या कामांची माहिती 'जलदर्पण' ॲपवर नोंदवणे आणि सर्व कामांचे जिओ-टॅगिंग (Geo-tagging) करून पोर्टलवर अपडेट करणे बंधनकारक राहील. कामाचा प्रगती अहवाल दर १५ दिवसांनी शासनास सादर केला जाणार आहे."
सेनगाव तालुक्यात दुष्काळी सावट गडद होत असताना शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात जलसंधारणाच्या कामांना गती मिळून रोहयोअंतर्गत मजुरांच्या हाताला काम आणि भूजलाची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.