Penganga River Water Storage: वाशिम जिल्ह्यातील पेनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या सर्व ११ बॅरेजचे उघडे असलेले दरवाजे येत्या १५ सप्टेंबरपासून बंद करून पाणी अडवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला
रब्बी हंगामासाठी पाणी साठवणुकीचे नियोजन
वाशिम (Penganga River Water Storage) : वाशिम जिल्ह्यातील पेनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या सर्व ११ बॅरेजचे उघडे असलेले दरवाजे येत्या १५ सप्टेंबरपासून बंद करून पाणी अडवण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. सध्या पावसाचे पाणी वाहून जात असल्यामुळे बॅरेजमध्ये साठवणूक करण्यासाठी हे दरवाजे वेळेत बंद केले जाणार आहेत. पेनगंगा नदीवर वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळी पेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर येथे हे बॅरेज उभारण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील या ११ बॅरेजची एकूण पाणी साठवण क्षमता ३३.२६ दशलक्ष घनमीटर (दलघमी) असून, ही क्षमता जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांच्या एकूण २८.८९ दलघमी क्षमतेपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे या बॅरेजमध्ये होणारा जलसाठा जिल्ह्यातील रब्बी हंगामाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. (Penganga River Water Storage) दरवाजे बंद केल्यानंतर नदीपात्रातील पाणी अडवले जाऊन बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होणार आहे.
मात्र, यंदा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे मध्यम व लघू प्रकल्प अर्धेच भरले असून बॅरेज शंभर टक्के भरतील का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. जर हे सर्व बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले, तर लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि विहिरींच्या भूजल पातळी वाढीसाठी मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे १५ सप्टेंबरनंतर या बॅरेजमध्ये प्रत्यक्ष किती टक्के पाणीसाठा जमा होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.