विनायक सरनाईक यांचा इशारा
‘हेअरकट’नुसार उर्वरित रक्कम भरण्याची बँकांची जबाबदारी, मग घोडं अडलं कुठं?
मुख्यमंत्री साहेब, बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पीककर्ज वितरणाचा आढावा घ्या!
चिखली (Vinayak Sarnaik) : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा चिखली येथे शेलगाव जहागीर येथील शेतकऱ्यांच्या, तर इंडियन ओव्हरसीज बँक, शाखा एकलारा येथे चंदनपूर व भोरसा-भोरसी येथील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम शासनाने ऑगस्ट महिन्यात खात्यांवर जमा केली. सेंट्रल बँकेने संबंधित शेतकऱ्यांची कर्जखाती बंद करण्यासाठी आवश्यक यादी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे.
असे असतानाही दीड महिना उलटून गेला, तरी ‘हेअरकट’नुसार भरावयाची व्याजाची व तफावतीची उर्वरित रक्कम अद्याप संबंधित कर्जखात्यांवर जमा झालेली नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळूनही शेतकऱ्यांची कर्जखाती बंद होण्यास विलंब होत असून, त्यांना नवीन पीककर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. शासनाने कर्जमाफीची रक्कम जमा केल्यानंतरही बँकांच्या स्तरावर पुढील प्रक्रिया रखडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, पात्र शेतकरी नवीन पीककर्जापासून वंचित राहत असल्याने या प्रकरणात बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी (Vinayak Sarnaik) विनायक सरनाईक यांनी केली आहे.
कर्जमाफीची रक्कम खात्यावर जमा होऊनही संबंधित शेतकऱ्यांची कर्जखाती अद्याप बंद झालेली नाहीत. खाते बंद करण्यासाठी बँकांकडून वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, दीड ते दोन महिने उलटूनही त्यावर निर्णय होत नसल्याने शेतकरी नवीन पीककर्जापासून वंचित राहत आहेत. खरीप हंगामात आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठीही कर्जाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्या अडचणींत भर पडली आहे.
शासनाने कर्जमाफीची रक्कम जमा केली असताना आणि उर्वरित व्याज व तफावतीच्या रकमेबाबत ‘हेअरकट’ची तरतूद असतानाही कर्जखाती बंद करण्यास विलंब का होत आहे, असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केला. शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल, तर बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणी शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी विनायक सरनाईक (Vinayak Sarnaik) यांनी तहसीलदार आणि सहाय्यक निबंधक यांची भेट घेतली. तहसील कार्यालयात या विषयावर बैठक घेण्यात आली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक प्रबंधकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
सेंट्रल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रलंबित कर्जखाती बंद करावीत, उर्वरित रकमेचा प्रश्न निकाली काढावा आणि पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सरनाईक यांनी केली. दोन दिवसांत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास संबंधित बँकेत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विनायक सरनाईक यांनी शेलगाव जहागीर, चंदनपूर आणि भोरसा-भोरसी येथील शेतकऱ्यांसह दिला आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर,सरपंच अरुण सरनाईक, उपसरपंच शिवशंकर ठेंग, श्रावण बडगे, गजानन ठेंग, पंजाबराव आटोळे, समाधान पंडागळे, परमेश्वर साळवे, औचितराव चव्हाण, अनिल परीहार, राजेश आंभोरे, संजय पंडागळे आणि अजाबराव बडगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री साहेब, बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पीककर्ज वितरणाचा आढावा घ्या!
‘हेअरकट’नुसार उर्वरित रक्कम भरण्याची जबाबदारी बँकांची आहे. यासंदर्भात शासन आणि बँकांमध्ये करार झालेला असतानाही व्याजाची व तफावतीची उर्वरित रक्कम बँका का भरत नाहीत? कर्जमाफीची रक्कम प्राप्त होऊनही शेतकऱ्यांची कर्जखाती बंद होण्यास विलंब का होत आहे? या प्रश्नाकडे राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे विनायक सरनाईक यांनी म्हटले. बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कर्जमाफीच्या प्रलंबित प्रकरणांचा आणि पीककर्ज वितरणाचा आढावा घ्यावा, अशी मागणीही (Vinayak Sarnaik) त्यांनी केली.
नवीन पीककर्जासाठी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून पाच कोरे स्टॅम्प पेपर कशासाठी?
इंडियन ओव्हरसीज बँकेत नवीन पीककर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून १०० रुपयांचे पाच कोरे स्टॅम्प पेपर मागितले जात असल्याचा मुद्दा विनायक सरनाईक (Vinayak Sarnaik) यांनी उपस्थित केला आहे. नवीन पीककर्जासाठी पाच कोरे स्टॅम्प पेपर देण्याची मागणी नेमक्या कोणत्या नियमाच्या किंवा आदेशाच्या आधारे केली जात आहे. शेतकऱ्यांकडून स्टॅप घेऊ नये असे आदेश असतांना बॅका मनमानी करीत असेल आणि तालुका प्रशासन यावर कठोर भूमिका घेत नसेल आणि शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागत असेल तर या शेतकऱ्यांची रक्कम संबंधित जबाबदारी अधिकारी यांनी भरुण देण्याची मागणी करु अजूनही वेळ गेली नाही बॅकांना वेळोवेळी नियमांची जाणीव करुण द्या अशी मागणी सरनाईक (Vinayak Sarnaik) यांनी केली आहे.