विठोली ग्रामस्थ आंदोलन

महामार्गावरील मटण दुकाने अनधिकृत कचरा आणि मोकाट कुत्र्यांचा हैदोस

Vitholi Villagers' Protest: मानोरा तालुक्यातील ग्राम विठोली येथून जाणाऱ्या महामार्गालगत अनधिकृत मटण दुकानांमुळे आणि तिथे जमणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे अपघातांचे सत्र सुरू असून, अनेक निष्पाप नागरिकांना.

महामार्गावरील मटण दुकाने अनधिकृत कचरा आणि मोकाट कुत्र्यांचा हैदोस

Vitholi Villagers' Protest

 

विठोलीत अपघातांची मालिका, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

८ दिवसांत कारवाई न झाल्यास रास्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा

मानोरा (Vitholi Villagers' Protest) : मानोरा तालुक्यातील ग्राम विठोली येथून जाणाऱ्या महामार्गालगत अनधिकृत मटण दुकानांमुळे आणि तिथे जमणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे अपघातांचे सत्र सुरू असून, अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत, विठोली येथील समस्त ग्रामस्थांनी तहसीलदार आणि ठाणेदार यांना एक कायदेशीर आणि संवैधानिक तरतुदींचा आधार असलेले निवेदन सादर केले आहे. पुढील ८ दिवसांत यावर ठोस कारवाई न झाल्यास तीव्र लोकशाही मार्गाने 'रस्ता रोको' आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

विठोली येथून जाणाऱ्या (Vitholi Villagers' Protest) महामार्गाला अगदी लागूनच नियमबाह्य पद्धतीने मांसाहारी (मटण) दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांमधील टाकाऊ जैविक कचरा, उरलेले मांस आणि हाडे रस्त्याच्या कडेला उघड्यावर टाकली जातात. या उघड्यावरील अन्नामुळे महामार्गावर हिंस्त्र व मोकाट कुत्र्यांचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. हे कुत्रे वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या मागे धावत असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे भीषण अपघात होत आहेत. या अपघातांमुळे अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, कित्येक नागरिक कायमचे अपंग झाले आहेत.

निवेदनात कायदेशीर आणि संवैधानिक कलमांचा आधार:
ग्रामस्थांनी केवळ तक्रार न करता, प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी कायदेशीर कलमांचा आधार घेतला आहे: संविधानाचे कलम २१: प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे जगण्याचा मूलभूत अधिकार आहे, त्याचे येथे उल्लंघन होत आहे.  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (कलम ४५): सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता राखणे हे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे,  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ चे कलम १६३: सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणणाऱ्या घटकांवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकार कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना आहेत, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ (FSSAI): महामार्गालगत उघड्यावर मांस विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

महामार्गालगतची सर्व मटण दुकाने तातडीने बंद करण्यात यावीत, या दुकानांचे महामार्गाव्यतिरिक्त अंतर्गत भागात किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, विठोली हद्दीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून त्यांचे निर्बीतीकरण किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे,  हा प्रश्न थेट नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराशी निगडित असल्याने प्रशासनाने यावर तात्काळ आदेश पारित करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जर ८ दिवसांच्या आत ठोस कारवाई झाली नाही, तर समस्त विठोली ग्रामस्थांच्या वतीने महामार्गावर तीव्र 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा कडक इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव तुकाराम मुंढे साहेब, स्थानिक खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक (वाशिम), कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग अमरावती यांनाही माहिती व योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. निवेदन देताना विठोली गावातील अनेक प्रमुख नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.