सौ. आरती राजेश वानखडे यांची तातडीने घटनास्थळी धाव; मृताच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्याची ठाम मागणी
मागणीच्या अनुषंगाने वारसाला कंत्राटी तत्त्वावर तत्काळ रुजू करून घेण्यास प्रशासनाची सहमती
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील मौजा भांबोरा येथे गुरुवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, चरणदास वासुदेव इखे (वय ५५) हे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करीत होते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या पत्नी व मुलासह ते शेतात कामासाठी गेले होते. जेवणाची वेळ झाल्यामुळे इखे यांच्या पत्नीने मुलाला वडिलांना बोलावण्यासाठी पाठवले.
मुलगा वडिलांना शोधत असताना त्याला शेतात रक्त सांडलेले दिसले. त्याने आईला याबाबत सांगितल्यानंतर पत्नी गावात परत आली आणि गावातील काही नागरिकांना घेऊन पुन्हा शेतात गेली. शोध घेत असताना शेतालगतच्या जंगलाच्या दिशेने चरणदास इखे यांना फरपटत नेल्याच्या खुणा आढळल्या. पुढे जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक पाहणीत वाघाने त्यांच्या नरडीवर हल्ला केल्याचे निदर्शनास आल्याची माहिती मिळाली आहे. परिसरात वाघाच्या पावलांचे ठसेही आढळले आहेत.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच आरती राजेश वानखडे आणि तहसीलदार सागर ढवळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर भांबोरा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आरती राजेश वानखडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली.
मृतदेहाचा पंचनामा सुरू असून पुढील तपास वन विभाग व मोर्शी पोलीस करीत आहेत.
आर्थिक मदतीऐवजी शासकीय नोकरीची मागणी
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांना वन विभागाच्या वतीने नियमानुसार आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, यावेळी मृताचे वारस आणि आरती राजेश वानखडे यांनी आर्थिक मदतीऐवजी मृताच्या वारसाला शासकीय सेवेत कायमस्वरूपी घेण्याची ठाम मागणी केली.
याबाबत आरती राजेश वानखडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे स्वीय सहाय्यक तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून वारसांच्या मागणीची माहिती दिली. त्यावर प्रशासनाकडून वन विभागाच्या माध्यमातून शासन स्तरावर मृताच्या वारसाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे, तातडीने मृताच्या वारसाला वन विभागांतर्गत कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले. त्याला नोकरीत कायमस्वरूपी निश्चित करण्यात येईल, याबाबत आरती राजेश वानखडे यांनी मृताच्या कुटुंबीयांना ठामपणे हमी दिली. तसेच या दुर्दैवी घटनेबद्दल त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी सौ. आरती राजेश वानखडे यांच्यासह तहसीलदार सागर ढवळे, प्रदीपभाऊ गौरखेडे, DFO सुमित कुमार, RFO प्रशांत भुजाडे, मोर्शी पोलीस ठाणेदार आठवले, तालुकाध्यक्ष विकास तट्टे, सचिन कोकाटे, नितेश जाने, गौरव मडघे, सागर माहोरे, अजय वरघट, योगेश बहुरूपी, संकेत कडू आदी उपस्थित होते.