ग्लोबल सिटी परिसरातील घटनेने खळबळ; मृत्यूपूर्वी गुजराती भाषेत व्हिडिओ केल्याची माहिती, पोलिसांकडून तपास सुरू
विरार : विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरात एकाच भाड्याच्या फ्लॅटमध्ये तीन अविवाहित भावंडांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुमार मेहता (५०), दिपेश मेहता (५२) आणि खेवना मेहता (४८) अशी मृतांची नावे आहेत. प्राथमिक तपासात विषारी पदार्थ सेवन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत्यूपूर्वी तयार केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी आजारपण आणि आर्थिक अडचणींचा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Virar, Maharashtra: Three siblings, two brothers and their sister, were found dead in a locked flat in Global City, Virar West. Police suspect suicide by poisoning. One of the deceased was reportedly suffering from cancer, and the family was facing financial difficulties. The investigation is underway
— IANS (@ians_india) October 29, 2026
ही तिन्ही भावंडे विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील गार्डन अव्हेन्यूच्या डी विंगमधील फ्लॅट क्रमांक १२०३ येथे राहत होती. गुरुवारी पहाटे त्यांच्या घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच बोळिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी तिन्ही भावंडांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. मृत्यू नेमका कधी झाला, याबाबत प्राथमिक अंदाज व्यक्त करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी मृतदेह सापडण्याच्या तीन ते चार दिवस आधीच त्यांचा मृत्यू झाला असावा, असे सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
The bodies of 3 elderly siblings were found inside a locked flat in the Global City (flat No. 1203, K Avenue, Wing D ) of Virar on Thursday. Police suspect that the three may have died by suicide after consuming poison https://t.co/rx2lPuRbHq
— Suhas Birhade ↗️ (@Suhas_News) October 29, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भावंडे २०२५ पासून संबंधित भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. त्यापैकी एकाला पक्षाघात झाला होता, तर एका भावावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. आरोग्याच्या समस्यांसोबतच त्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत होता.
मृत्यूपूर्वी या तिघांनी गुजराती भाषेत एक व्हिडिओ तयार केल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या आजारपणाबरोबरच आर्थिक अडचणींचाही उल्लेख केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी या भावंडांच्या बहिणीशी संपर्क साधला. तिने दिलेल्या माहितीनुसार, तिघेही आर्थिक अडचणींमध्ये होते. त्यांनी तिच्याकडूनही पैशांची मदत मागितली होती. या घटनेमागील नेमकी परिस्थिती आणि मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी बोळिंज पोलीस पुढील तपास करत आहेत.