Kavad Yatra Accident: भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने कावड यात्रेत सहभागी १० वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याने त्याचा जागीच अंत झाला. जळगाव-ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदिरा जवळ दुर्दैवी घटना
जळगाव-ममुराबाद रस्त्यावर भीषण अपघात: संतप्त जमावाने वाहन पेटवले
जळगाव (Kavad Yatra Accident) : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने कावड यात्रेत सहभागी १० वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याने त्याचा जागीच अंत झाला. जळगाव-ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदिरा जवळ सोमवारी सायंकाळी ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या अपघातानंतर प्रचंड संतप्त नागरिकांनी आयशर ट्रकला पेटवन दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जळगावातील शनीपेठ परिसरातील गवळीवाड्यातून निघालेली कावड यात्रा म्हाळसादेवी मंदिराकडे आली होती. पूजा व दर्शन आटोपून भाविक परत जात असताना, जळगावकडून चोपड्याकडे किराणा माल घेऊन जाणाऱ्या 'ओम शांती ट्रान्सपोर्ट'च्या (MH-20-EG-3593) आयशर वाहनाने १० वर्षीय प्रबळ राजू गवळी याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनाने बालकाला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण धडकेत प्रबळचा जागीच दुर्दैवी अंत झाला.
नातेवाईकांचा आक्रोश व रास्ता रोको
अपघाताची माहिती मिळताच प्रबळचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. एकुलता एक मुलगा गमावल्याने गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. संतप्त नातेवाईकांनी व नागरिकांनी रस्ता रोखून धरला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाला तातडीने ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली.
संतप्त जमावाने आयशर पेटवले, पोलिसांचा ताफा दाखल
घटनेमुळे (Kavad Yatra Accident) संतप्त झालेल्या जमावाने किराणा मालाने भरलेल्या आयशर वाहनाला आग लावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गर्दी पांगवताना किरकोळ धक्काबुक्कीही झाली. सायंकाळी ५ ते ६:३० वाजेदरम्यान या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलत अपघातातील आयशर चालकाला ताब्यात घेतले आहे. चालकावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे गवळीवाडा व ममुराबाद परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.