दिंडोरी प्रणित स्वामी सेवेकऱ्यांकडून सेवा सदन व बालसुधार गृहात फराळाचे वाटप
खानापूर चित्ता (Dindori Swami Sevakars) : दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. मात्र ज्या चिमुकल्यांच्या आयुष्यात आई-वडिलांची सावलीच नाही, त्यांच्या दिवाळीतही आनंदाचा प्रकाश आणण्याचे पवित्र कार्य अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित बालसंस्कार विभागाने केले.
दिवाळी निमित्त हिंगोली येथील सेवा सदन मुलांचे वस्तीगृह व समर्थ बाल सुधारगृह, खानापूर फाटा येथे अनाथ मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले. फराळ मिळताच या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सेवा सदनच्या संचालिका श्रीमती मीरा कदम या होत्या. त्यांच्या हस्ते मुलांना फराळाचे वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित सर्व अठरा विभागातील प्रतिनिधी, बालसंस्कार विभागातील सर्व प्रतिनिधी व जिल्हा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मुलांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना प्रेमाचा आधार दिला.
स्वामी समर्थांची शिकवण आहे - "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." याच शिकवणीतून सेवा हाच खरा धर्म मानून बालसंस्कार विभागाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन हलगे (बालसंस्कार जिल्हा समन्वयक), अभिमन्यु ढोणे (ग्राम अभियान व तालुका समन्वयक हिंगोली). प्रदीप जाधव, कुंडलिकराव मस्के, भालेराव ,गोविंद ढोणे, रविराज नागरे, लोथे, नितीन मस्के, ओमकार जाधव, समर्थ ढोणे, ज्ञानेश्वर सोडगीर, (ग्रामअभियान समन्वयक) महिला सेवेकरी सारिका ताई ढोणे, सुषमाताई जाधव (बालसंस्कार जिल्हा समन्वयक) गंगासागर कऱ्हाळे, स्वातीताई सोडगीर, शितलताई ढोणे (बालसंस्कार व ग्राम अभियान समन्वयक) व अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित नाईक नगर हिंगोली येथील सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.