Sukali Dog Attack: सेनगाव तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः दहशत निर्माण केली असून, सायंकाळच्या सुमारास या कुत्र्याने तीन जणांना चावा घेतल्याची घटना घडली.
दहा कुत्र्यांनाही चावा; तीघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार, तातडीने बंदोबस्ताची मागणी
सेनगाव (Sukali Dog Attack) : सेनगाव तालुक्यातील सुकळी बुद्रुक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः दहशत निर्माण केली असून, सायंकाळच्या सुमारास या कुत्र्याने तीन जणांना चावा घेतल्याची घटना घडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील तब्बल दहा इतर कुत्र्यांनाही चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातील संतोष धाकतोडे, पांचाळ महाराज पुजारी तसेच विद्यार्थीनी रूषीका सिरसाठ यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून त्यांना चावा घेतला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी आरडाओरड करून (Sukali Dog Attack) कुत्र्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.
कुत्र्याच्या हल्ल्यात (Sukali Dog Attack) जखमी झालेल्या रूषीका सिरसाठ व पांचाळ महाराज पुजारी, संतोष धाकतोडे यांना तातडीने हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील इतर कुत्र्यांनाही चावा घेतल्याने नागरिकांमध्ये अधिकच चिंता वाढली आहे.
गावातील मुख्य रस्ते, वस्ती तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा असलेल्या भागात पिसाळलेल्या कुत्र्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः लहान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त न झाल्यास आणखी नागरिकांना चावा घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश पाचपिल्ले यांनी या गंभीर घटनेची दखल घेत पंचायत समिती कार्यालयाकडे लेखी निवेदन सादर केले आहे. सुकळी बुद्रुक येथे पिसाळलेल्या कुत्र्यामुळे निर्माण झालेली दहशत लक्षात घेता संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना करून या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
गावकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने पथक पाठवून पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कुत्र्यांचीही तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.