Sukli Lake Project: सेनगाव तालुक्यातील सुकळी गावाजवळ प्रस्तावित असलेला १४३४.३६ कोटी रुपयांचा सुकळी साठवण तलाव प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटन
हिंगोली (Sukli Lake Project) : सेनगाव तालुक्यातील सुकळी गावाजवळ प्रस्तावित असलेला १४३४.३६ कोटी रुपयांचा सुकळी साठवण तलाव प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रस्तावित प्रकल्पामुळे सुकळी खुर्द, सुकळी बुद्रुक, दाताळा खुर्द आणि दाताळा बुद्रुक परिसरातील शेकडो एकर सुपीक आणि बागायती जमीन पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असून या भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या खर्चिक आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पाऐवजी सरकारने येलदरी धरणातून कालवा काढून सेनगाव तालुक्यातील दुष्काळी भागाला सिंचनासाठी पाणी द्यावे, अशी ठोस भूमिका संघटनेने मांडली आहे. शेतकऱ्यांची जमीन वाचली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आले पाहिजे, शेती हिरावून घेऊन पाणी देण्याचा घाट कशासाठी, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही परिस्थितीत जमीन संपादन करू नये, बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या हरकती लेखी स्वरूपात नोंदवून घ्याव्यात आणि या प्रकल्पाचा संपूर्ण सविस्तर प्रकल्प अहवाल व खर्चाची माहिती पारदर्शकपणे शेतकऱ्यांसमोर ठेवावी, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
हे निवेदन देताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि बाधित शेतकरी उपस्थित होते. या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास सेनगाव तहसील कार्यालयापासून ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.