गेवराईतील समर्थ खरात याचा पाथर्डी येथील हिंद वसतिगृहात मृत्यू; वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून शिक्षक सुभाष घुगे यांच्याविरोधात कारवाई
बीड : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील हिंद वसतिगृहात राहणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचे विद्यार्थ्याने वडिलांना सांगितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात शिक्षक सुभाष घुगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थ आबासाहेब खरात (वय १३, रा. कवडगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पाथर्डी येथील हिंद वसतिगृहात राहून सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचा भाऊ साई खरात हा याच ठिकाणी पाचवीत शिकत होता.
वसतिगृहात कार्यरत असलेले शिक्षक सुभाष घुगे हे गेल्या काही दिवसांपासून विनाकारण त्रास देत असल्याचे समर्थने आपल्या वडिलांना सांगितले होते, अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर रोजी दुपारी समर्थने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेनंतर विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. त्यानंतर समर्थच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पाथर्डी पोलिसांनी शिक्षक सुभाष घुगे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेमुळे वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांशी कशा प्रकारे वर्तन केले जाते, तसेच विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारींची संबंधित प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जाते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.