औंढा तालुक्याचा भूमिपुत्र बनला राज्यपातळी वरील नेता
जवळाबाजार (State Market Committee Federation) : औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील सरपंच पदापासून राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केलेल्या अंकुशराव आहेर यांची राज्य बाजार समिती महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पावन स्पर्श लाभलेले सभापतीपदाच्या खुर्चीवर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील भूमिपुत्र अंकुशराव आहेर यांना बसण्याचा मान मिळणार आहे. राज्यातील बाजार समितीचा मुकुटमणी असलेल्या या महासंघावर बहुतांश काळ पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व राहिले आहे. मराठवाड्यातील अंबेजोगाई येथील बाबुराव आडसकर अल्पकाळ या महासंघाचे अध्यक्षपदी विराजमान होते.
आजरसोंडा येथील सरपंच पदापासून राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर अंकुशराव आहेर (State Market Committee Federation) यांनी आज पर्यंत जिल्हा परिषद सदस्य व गटनेता, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद भूषवले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पणन मंत्री जयप्रकाश रावल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घालून भाजपाचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर यांची बिनविरोध निवड होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. महाविकास आघाडीच्या संचालकांनी सुद्धा बिनविरोध निवडीसाठी पाठबळ दिल्यामुळे अंकुशराव आहेर यांनी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त केले.