तालुक्यातील सोमनाथनगर येथील घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत जाणूनबुजून नावे वगळल्याचा गंभीर आरोप समस्त गावकरी मंडळी, सोमनाथनगर यांनी केला आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पदमुक्त करण्याची मागणी
मानोरा : तालुक्यातील सोमनाथनगर येथील घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत जाणूनबुजून नावे वगळल्याचा गंभीर आरोप समस्त गावकरी मंडळी, सोमनाथनगर यांनी केला आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज साद करण्यात आला आहे.
सोमनाथनगर गावातील ग्रामपंचायत कर्मचारी उल्हास परशराम राठोड हे हेतुपुरस्सरपणे पैशाची देवाणघेवाण करून अपात्र लोकांची नावे घरकुल यादीत समाविष्ट करतात व खऱ्या पात्र लोकांना त्रुटीमध्ये दाखवून त्यांची नावे वगळतात, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच, हा कर्मचारी ग्रामपंचायत चपराशी असून गावातील लोकांना दमदाटी करतो आणि पैशाची मागणी करतो, असाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तो स्थानिक राजकारणाच्या जोरावर कार्यरत आहे आणि जाणूनबुजून लाभार्थ्यांची नावे त्रुटीत टाकत आहे. त्याच्या या कृतीने गावात चांगलीच माया जुळविली आहे. विनापैशाची तो कोणाचेही काम करण्यास तयार नाही, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
हा मुद्दा अतिशय संवेदनशील असून या व्यक्तीबाबत गावात रोष निर्माण झाला आहे. भविष्यात काही अनर्थ घडू नये यासाठी लाचखोर व राजकारण करणाऱ्या कर्मचाऱ्याला ताबडतोब पदमुक्त करावे, अशी मागणी समस्त गावकरी मंडळी, सोमनाथनगर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर प्रेम राठोड, तारासिंग चव्हाण, बाळू राठोड, गंगाराम चव्हाण, नरेंद्र राठोड, उंदीबाई पवार यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.