डोंबिवली एमआयडीसीतील साईदीप आणि इंद्रनील सोसायट्यांना नोटीस; स्मार्ट मीटरला रहिवाशांचा विरोध, कारवाईच्या इशाऱ्याने संताप
डोंबिवली : स्मार्ट मीटर बसवण्याच्या मुद्द्यावरून महावितरण आणि डोंबिवलीतील रहिवाशांमधील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. एमआयडीसी निवासी परिसरातील दोन गृहनिर्माण सोसायट्यांना स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सहकार्य करण्याचे निर्देश देत महावितरणने २४ तासांची मुदत दिली आहे. या कालावधीत मीटर बदलण्यासाठी प्रवेश न दिल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या नोटिसांमुळे सोसायट्यांमधील रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील साईदीप आणि इंद्रनील या दोन सोसायट्यांना महावितरणकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या दोन्ही सोसायट्यांमध्ये मिळून ८० निवासी फ्लॅट्स आहेत. जुन्या वीज मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणचे अधिकारी आणि खासगी कंत्राटदारांना प्रवेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, रहिवाशांनी मीटर रूमला कुलूप लावल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मीटरपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत.
स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढण्याची भीती
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून या भागातील नागरिक स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध करत आहेत. नवीन मीटरमुळे वीजबिलात वाढ होण्याची शक्यता असल्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मीटर बदलण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी काही सोसायट्यांनी मीटर रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर बसवणे सक्तीचे नसल्याचे जाहीर केले असतानाही महावितरणचे अधिकारी दबाव टाकत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. नागरिकांना विश्वासात न घेता परस्पर मीटर बदलण्याचे प्रयत्न होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
कायद्याचा आधार देत महावितरणाचा इशारा
महावितरणने पाठवलेल्या नोटिशीत विद्युत कायदा, २००३ मधील कलम ५५ आणि १६३ तसेच केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या (CEA) मीटर स्थापना आणि संचालनासंदर्भातील सुधारित नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कायदेशीर तरतुदींचा आधार घेत ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला विरोध करता येणार नसल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. २४ तासांच्या आत आवश्यक सहकार्य न मिळाल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
इंद्रनील सोसायटीचे अध्यक्ष अमेय पारकर हे कामानिमित्त बाहेर असल्याने महावितरणचे अधिकारी आणि कंत्राटदारांनी शुक्रवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांकडे नोटीस सुपूर्द करण्यात आली. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
महावितरणाने मांडली स्मार्ट मीटरची बाजू
दरम्यान, स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अधिक अचूक नोंद ठेवणे शक्य होणार असून त्यामुळे ग्राहकांची बिले वाढणार नाहीत, अशी भूमिका महावितरणने मांडली आहे. बेकायदेशीर पद्धतीने वीज वापरणाऱ्या ग्राहकांकडूनच स्मार्ट मीटरला विरोध केला जात असल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे.
महावितरणच्या आकडेवारीनुसार, कल्याणमधील एकूण ३ लाख ९१ हजार वीज ग्राहकांपैकी १ लाख ८१ हजारांहून अधिक ग्राहकांकडे आतापर्यंत स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत.
मात्र, स्मार्ट मीटरची उपयुक्तता आणि ते बसवण्याची पद्धत यावरून नागरिक आणि महावितरण यांच्यातील मतभेद कायम आहेत. आता २४ तासांच्या अल्टिमेटमनंतर महावितरण कोणती भूमिका घेते आणि सोसायट्यांमधील वीजपुरवठ्याबाबत काय निर्णय होतो, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.