पातूर (Shri Khadkeshwar Ganeshotsav Mandal) : परंपरा, संस्कृती, कलाकुसर आणि सामाजिक संदेश यांचा अनोखा संगम साधत पातूर येथील ‘श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून दरवर्षी विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तू, पुरातन साहित्य, वाद्ये, भांडी तसेच विविध साहित्याचा कल्पक वापर करून गणेशमूर्ती साकारण्याची मंडळाची परंपरा आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने कलात्मक गणेशमूर्तींच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरणपूरक संदेश देण्याबरोबरच स्थानिक कारागीर, कलाकार, शेतकरी आणि विविध पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. मंडळाच्या या अनोख्या संकल्पनेची दखल विविध स्तरांवरील गणेशोत्सव स्पर्धांमध्ये घेण्यात आली असून मंडळाने अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत.
पुरस्कारांची गौरवशाली परंपरा:
२०१६: महाराष्ट्र शासनाच्या विभागीय स्तरावरील गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक.
२०१७, २०१८, २०१९, २०२१: राज्यस्तरीय स्पर्धा नसतानाही जिल्हा व तालुका स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व कायम ठेवले.
२०२२ व २०२३: महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत श्री खडकेश्वर मंडळाने सलग दोन वर्षे राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
२०२४ ची ‘प्लंबिंग’ संकल्पना ठरतेय विशेष आकर्षण:
यंदाही मंडळाने आपली वेगळी परंपरा कायम ठेवत ‘प्लंबिंग’ या संकल्पनेतून गणेशमूर्तीची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. विविध प्लंबिंग साहित्याचा कल्पक वापर करून तयार करण्यात आलेली ही कलाकृती सध्या भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून दरवर्षी नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विशेष मेहनत घेतली जाते. त्यामुळे हा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता कला, कौशल्य, कल्पकता आणि सामाजिक संदेश देणारा उत्सव ठरत आहे.