शंतनु बोंद्रे

पेनटाकळीच्या पाण्यावरून राजकीय द्वंद्व; '३१ वर्षांत सत्ता बदलली, मग पाण्याचे नियोजन का नाही?'

Shantanu Bondre: बुलढाणा जिल्ह्यात यंदा दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना, महत्त्वाकांक्षी अशा पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणीवाटपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे...

पेनटाकळीच्या पाण्यावरून राजकीय द्वंद्व; '३१ वर्षांत सत्ता बदलली, मग पाण्याचे नियोजन का नाही?'

Shantanu Bondre

 

शंतनु बोंद्रे यांचा सर्वपक्षीय नेतृत्वाला थेट सवाल

चिखली (Shantanu Bondre) : बुलढाणा जिल्ह्यात यंदा दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना, महत्त्वाकांक्षी अशा पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणीवाटपावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाणीवाटपावरून लोकप्रतिनिधींमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी पाटबंधारे मंत्री (कै.) भारतभाऊ बोंद्रे यांचे सुपुत्र शंतनु बोंद्रे (Shantanu Bondre) यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतृत्वाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “धरणाच्या पाण्यावर केवळ राजकारण आणि कुरघोडी करण्यापेक्षा, गेल्या ३१ वर्षांत नवीन धरणांची निर्मिती आणि शाश्वत पाण्याचे नियोजन का झाले नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

​पेनटाकळी प्रकल्पावरून राजकीय संघर्ष तीव्र
​पेनटाकळी मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या वितरणावरून सध्या बुलढाणा जिल्ह्यात दोन स्पष्ट राजकीय प्रवाह समोरासमोर आले आहेत:
​केंद्रातील व स्थानिक नेतृत्वाची मागणी: धरणाच्या खालील भागातील शेतकऱ्यांची तूर, हळद यांसारखी पिके धोक्यात आल्याने त्यांना तातडीने पाणी सोडण्यात यावे, यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर आक्रमक भूमिकेत आहेत.
स्थानिक आमदारांची भूमिका: चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी प्रकल्पाच्या वरील भागातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा हक्क अबाधित राखत, भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करूनच पाण्याचे वितरण करावे, असा पवित्रा घेतला आहे.
​या परस्परविरोधी भूमिकांमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून पाणीवाटपाचा प्रश्न शेतकरी हितापेक्षा राजकीय प्रतिष्ठेचा बनला आहे.

​“धरण म्हणजे केवळ सिमेंटचे बांधकाम नव्हे, ५० वर्षांचे नियोजन!”
​या वादाच्या पार्श्वभूमीवर शंतनु बोंद्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना कोणत्याही विशिष्ट नेत्यावर टीका न करता, सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टीच्या अभावावर बोट ठेवले.
​ते म्हणाले, “आज जिल्ह्यात अल-निनो आणि पावसाच्या कमतरतेमुळे भीषण दुष्काळी सावट आहे. शेतकरी डोळ्यांसमोर पीक जळताना पाहून हवालदिल झाला आहे. एका बाजूला शेतीचे पाणी आणि दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे भविष्यातील नियोजन, असा दुहेरी पेच निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात मला माझे वडील (कै.) भारतभाऊ बोंद्रे यांची प्रकर्षाने आठवण होते. भारतभाऊंनी चिखली मतदारसंघाचे तब्बल २२ वर्षे नेतृत्व केले आणि पाटबंधारे मंत्री असताना जिगाव, खडकपूर्णा, पेनटाकळी यांसारखे मोठे-मध्यम प्रकल्प तसेच ब्राह्मणवाडा, हराळखेड, करडी, मासरूळ, शिवनी आरमाळ यांसारखे शेकडो पाझर तलाव उभे केले किंवा त्यांच्या कामाला गती दिली.”
​“धरण म्हणजे केवळ सिमेंट-काँक्रीटचे बांधकाम नसते, तर ते येणाऱ्या ५०-१०० वर्षांचे आणि पुढील पिढ्यांचे शाश्वत नियोजन असते,” असेही बोंद्रे यांनी ठामपणे नमूद केले.

​गेल्या ३१ वर्षांच्या कालखंडावर रोकठोक सवाल
​१९९५ नंतरच्या राजकीय कालखंडाचा पाढा वाचताना बोंद्रे यांनी सर्वपक्षीय आजी-माजी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. त्यांनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे:
1. ​नवीन जलप्रकल्प कुठे आहेत? : १९९५ मध्ये भारतभाऊ आमदारकीतून बाजूला झाले. आज ३१ वर्षांचा कालखंड उलटूनही या काळात नव्या नेतृत्वाने जिल्ह्यात कोणते मोठे धरण किंवा ठोस जलप्रकल्प उभा केला?
2. ​सिंचन क्षमतेत किती वाढ? : तीन दशकांत सत्तेची सर्व समीकरणे बदलली, मात्र प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले? सिंचन क्षमतेचा आलेख का उंचावला नाही?
3. ​कुरघोडीचे राजकारण थांबवा : सध्या धरणातील शिल्लक पाण्यावरून सुरू असलेले राजकारण आणि एकमेकांना शह-काटशह देण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. राजकीय श्रेयासाठी प्रशासकीय यंत्रणेला वेठीस न धरता प्रशासनाला नियमांनुसार काम करू दिले पाहिजे.

​‘निवडणुकीपुरते राजकारण करा, पाण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत’
​“नेते बदलतील, सत्ता आणि सरकारे बदलतील; परंतु दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाणी हा कोण्या एका पक्षाचा किंवा निवडणुकीपुरता मर्यादित विषय नसून बुलढाणा जिल्ह्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे एकमेकांची जिरवण्यापेक्षा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याला समृद्धीकडे नेण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत,” असे आवाहन शंतनु बोंद्रे यांनी शेवटी केले.

टैग्स: Shantanu Bondre

संबंधित सामग्री

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शंतनु बोंद्रे यांची मागणी

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शंतनु बोंद्रे यांची मागणी

बुलढाण्यात पावसाअभावी खरीप पिके संकटात; कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह दिवसा वीजपुरवठा व नादुरुस्त डीपी बदलण्याची शंतनु बोंद्रे यांची मागणी.

Sep 10, 2026
खडकपूर्णा प्रकल्पात अंचरवाडी ल.पा तलाव १ क्र. व मिसळवाडी लघुतलावांचा समावेश करावा: शंतनू बोन्द्रे

खडकपूर्णा प्रकल्पात अंचरवाडी ल.पा तलाव १ क्र. व मिसळवाडी लघुतलावांचा समावेश करावा: शंतनू बोन्द्रे

Khadakpurna Project: खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन योजना (टप्पा क्र. ३) अंतर्गत लाभक्षेत्रामध्ये अंचरवाडी लघु पाटबंधारे तलाव क्रमांक १, अंचरवाडी लघु पाटबंधारे तलाव क्रमांक २ आणि मिसळवाडी लघु पाटबंधारे

Aug 06, 2026