Sengaon Police Action: सेनगाव पोलिस ठाण्याला वार्षिक तपासणी झाली. तपासणीतील लपविलेल्या अवैध धंद्यांबद्दल पाटलांवर कायदा कारवाई करण्याचे निर्णय.
सेनगाव (Sengaon Police Action) : सेनगाव पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी बुधवारी (ता. २६) केली. यावेळी पोलिस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेत त्यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा तपास गतीने पूर्ण करून कोणतेही गुन्हे प्रलंबित राहणार नाहीत, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. तपासणीदरम्यान पोलिस ठाण्यातील विविध नोंदी, गुन्हे तपासाची स्थिती आणि कामकाजाची पाहणी करून डॉ. लोढा यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
दरम्यान, सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी हस्तगत केलेले दागिने व अन्य मुद्देमाल संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. लोढा यांच्या हस्ते हा मुद्देमाल संबंधितांना वितरित करण्यात आला. तसेच पोलिस ठाणे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांतील पोलीस पाटलांची आढावा बैठक घेण्यात आली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांची सुरक्षा, तसेच गावातील विविध घडामोडींविषयी पोलिसांना वेळेत माहिती देण्याबाबत डॉ. लोढा यांनी मार्गदर्शन केले.
गावातील अवैध धंदे अथवा बेकायदेशीर व्यवसायांची माहिती पोलीस पाटलांनी पोलिस यंत्रणेला देणे आवश्यक आहे. ही माहिती जाणीवपूर्वक लपविल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पोलीस पाटलांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. श्रेणिक लोढा यांनी बैठकीत दिला. यावेळी सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, पोलिस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे, नागेश शेट्टीवार यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.