सातेफळ वाळू उपसा प्रकरण

परभणीत सातेफळ वाळू उपसा प्रकरणी; मंडळ अधिकारी, तलाठी निलंबीत

Satephal sand mining case: सातेफळ येथील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या बेसुमार अन् बेकायदेशीर वाळू उपशाकडे डोळेझाक करणे कावलगाव मंडळाच्या महसूल अधिकार्‍यांना चांगलेच महागात पडले आहे.

परभणीत सातेफळ वाळू उपसा प्रकरणी; मंडळ अधिकारी, तलाठी निलंबीत

Satephal sand mining case

 

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आदेश; महसूल विभागात खळबळ

पूर्णा (Satephal sand mining case) : सातेफळ येथील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या बेसुमार अन् बेकायदेशीर वाळू उपशाकडे डोळेझाक करणे कावलगाव मंडळाच्या महसूल अधिकार्‍यांना चांगलेच महागात पडले आहे. मंडळ अधिकारी जी.एस. साखरे, तलाठी प्रज्ञा गायकवाड यांच्यावर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या बाबत ७ ऑक्टोबर रोजी आदेश काढण्यात आले आहेत.  या कारवाई नंतर पूर्णा तालुक्यात महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

सातेफळ येथील वाळू उपशा बाबत तक्रार आल्यानंतर खणिकर्म पथकाने छापा टाकला. सातेफळ जुना गावठाण परिसरातील गट क्रमांक १० जवळ गोदावरी पात्रातून वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ५ ऑक्टोबर रोजी केली होती. कारवाईत शंभर ते सव्वाशे ब्रास अवैध वाळू साठा, वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे दहा तराफे आढळून आले. पथकाने पंचनामे करत वाळूसाठा जप्त केला. या प्रकरणात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

मंडळ अधिकारी जी.एस. साखरे, सातेफळ आलेगाव सज्जाच्या तलाठी प्रज्ञा गायकवाड यांच्यावर कारवाई झाली आहे. अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण ठेवण्यात आणि वरिष्ठांना माहिती देण्यात संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचे भंग केल्याने जिल्हाधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली. या कारवाई नंतर महसूल मधील हलगर्जीपणा करणार्‍या इतर अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.