नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर अल्टो कारमध्ये आढळला मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघड, अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याची माहिती, CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात
पुणे : पुण्यातील गजबजलेल्या सारसबाग परिसरात एका बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उभ्या असलेल्या मारुती अल्टो कारमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मृत तरुणाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याची प्राथमिक माहिती असून, त्याचा घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे.
मृत तरुणाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तो काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती लोणी काळभोर येथील रहिवासी असण्याची शक्यता आहे.
दुर्गंधीमुळे उघडकीस आली घटना
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर एक चारचाकी वाहन अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी उभे होते. बुधवारी या वाहनातून असह्य दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यानंतर दादाची वाडी येथील जैन मंदिर परिसरातील एका व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून याची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कारची तपासणी केली असता आतील सीटवर एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनाचा क्रमांक MH12 SF 5471 असून, ती मारुती कार आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेली नाही. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी संबंधित तरुणाच्या भावांना बोलावण्यात आले असून, त्यांनी मृतदेहाची खात्री केल्यानंतर नाव निश्चित केले जाणार आहे.
मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार
पोलिसांनी घटनास्थळावरील प्राथमिक तपास पूर्ण केल्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत्यू एक ते दोन दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यू नेमका कधी आणि कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
घातपाताचा संशय; CCTV फुटेजची तपासणी सुरू
तरुणाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की त्यामागे काही घातपात आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. संबंधित कार नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर कोणी आणून उभी केली, मृत तरुण त्या ठिकाणी कसा पोहोचला आणि या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे का, अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी खडक पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. तसेच कार आणि घटनास्थळाशी संबंधित अन्य बाबींचीही चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासातून या रहस्यमय मृत्यूमागील नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.