शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पक्षात नाराजी; कारवाई करण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती
मुंबई : शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विधानाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, गायकवाड यांच्याविरोधात पक्षांतर्गत कारवाई केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मातीला जाऊ नये, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळासह विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर काहींनी त्यांची बाजू घेत समर्थन केले.
दरम्यान, या विधानामुळे केवळ विरोधकच नव्हे, तर शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्तेही नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिंदे गटाकडून मदतीसाठी प्रयत्न केले जात असताना गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
शेतकरी हा अन्नदाता असून त्यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य सहन केले जाणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची दखल घेत संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पक्षाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संजय गायकवाड यांच्या हकालपट्टीची मागणी
दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून आरपीआय नेते सचिन खरात यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गायकवाड यांच्या विधानाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी खरात यांनी केली आहे.
इतकेच नव्हे, तर संजय गायकवाड यांना ठाणे येथील मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची मागणीही सचिन खरात यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय संघर्षाचे स्वरूप घेताना दिसत आहे. संजय गायकवाड यांच्याविरोधात शिंदे गटाकडून प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.