मुंबईत २९ सप्टेंबरच्या मोर्चासाठी झाले समाजबांधव सज्ज..
बुलढाणा (Sakal Matang Samaj) : सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी अद्यापही महाराष्ट्र सरकारने केली नाही, या विषयाला घेवून राज्यभरात जवळपास ७४ मोर्चे काढण्यात आले असून विविध आंदोलने करण्यात आली आहे. आता या (Sakal Matang Samaj) आंदोलनाचा समारोप म्हणून सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर २९ सप्टेंबर २०२६ रोजी 'निर्धार महाआंदोलन' करण्यात येणार असून बुलढाणा जिल्ह्यातून ५ हजारापेक्षा अधिक मातंग समाजबांधव निर्धार महाआंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती, अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे पदाधिकारी आणि समाजनेत्यांनी पत्रकारांना दिली.
येथील विश्राम भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून निर्धार महाआंदोलनाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी निवृत्ती तांबे, श्रीकृष्ण शिंदे, सोपान पानपाटील, विनोद महाले, बी. के. खरात, दादाराव महाले, दिलीप बावस्कर, गजानन गायकवाड, नारायण सोमणकर आर्दिनी पत्रकारांना संबोधित केले.
अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या जातीसमूहांना बाबासाहेबांनी सांगितलेल्या सामाजिक न्यायाप्रमाणे न्याय मिळणे अपेक्षित असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाचा निर्णय दिला आहे. पंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांनी उपवर्गीकरण करीत सामाजिक न्यायाची परंपरा राखली असल्याकडे श्री तांबे यांनी लक्ष वेधले, जे जे उपवर्गीकरणाला विरोध करीत आहेत, ते बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय संकल्पनेचा अपमान करीत असल्याचे मतही संबंधीत नेत्यांनी व्यक्त केले.
'आ. सिद्धार्थ खरात यांनी उपवर्गीकरणाला केलेला विरोध' याबाबत मत विचारले असता शिंदे म्हणाले की, २०२४ च्या निवडणूकीत मातंग समाजाने आ. खरात यांना पूर्ण सहकार्य केले होते. परंतु त्यांची उपवर्गीकरण संदर्भातील विरोधी भूमिका लक्षात घेता २०२९ च्या निवडणूकीत आ. खरात यांना समाजबांधव त्यांची जागा दाखवून देवू. विशेष म्हणजे आ. संजय गायकवाड यांनी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, अशी भूमिका घेतली असल्याचे शिंदे म्हणाले.
मुंबईच्या मोर्चासाठी समाजनेते विजय अंभोरे यांच्या मार्गदर्शनात तयारी सुरु असल्याचेही अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व (Sakal Matang Samaj) मातंग समाज बांधवांनी उपवर्गीकरणाच्या या लढ्यात मोठ्या संख्येत सहभागी होवून मुंबईचा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन नेतेमंडळींनी केले आहे.