रिसोड घंटागाडी बंद

रिसोडमध्ये घंटागाड्या बंद; दिवाळीच्या तोंडावर शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरण्याची भीती

Risod Garbage Gadi: शहरातील कचरा संकलनासाठी असलेल्या घंटागाड्या आज बंद राहिल्यामुळे शहरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराने घंटागाडी कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून...

रिसोडमध्ये घंटागाड्या बंद; दिवाळीच्या तोंडावर शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरण्याची भीती

Risod Garbage Gadi

रिसोड (Risod Garbage Gadi) : शहरातील कचरा संकलनासाठी असलेल्या घंटागाड्या आज बंद राहिल्यामुळे शहरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदाराने घंटागाडी कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन अदा न केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

घंटागाड्या बंद (Risod Garbage Gadi) असल्यामुळे शहरातील विविध भागांमधील दैनंदिन कचरा संकलनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. आधीच दिवाळीचा सण तोंडावर असताना शहरातील स्वच्छता व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वेळेत कचरा उचलला गेला नाही, तर आगामी सणासुदीच्या दिवसांत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.नियमानुसार ठेकेदाराने स्वतःच्या स्तरावरून दरमहा कामगारांना वेळेत वेतन देणे अपेक्षित असताना, ठेकेदार मात्र विनाकारण नगर परिषदेच्या निधी वितरणावर अवलंबून राहत आहेत. प्रशासकीय प्रक्रियेची प्रतीक्षा करण्याच्या या खेळात ऐन दिवाळीच्या तोंडावर सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कामगारांना दरमहा नियमित वेतन देणे ही मूळची ठेकेदाराची जबाबदारी असते. मात्र, बिल पास होण्याचे किंवा नगर परिषदेकडून पैसे मिळण्याचे कारण पुढे करत ठेकेदार कामगारांच्या पगाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. आर्थिक बाजू भक्कम असणाऱ्या ठेकेदारांनी स्वतःकडील निधीतून कामगारांचे वेतन अदा करणे गरजेचे असताना, त्यांच्या या दिरंगाईमुळे गोरगरीब कामगारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे.

कामगारांमध्ये तीव्र रोष
सण-सुदीच्या काळात घर कसे चालवायचे, असा प्रश्न कामगारांसमोर उभा ठाकला आहे. ठेकेदाराच्या या बेजबाबदार कारभारामुळे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरत आहे. वेतनासाठी कामगारांना वेठीस धरणाऱ्या अशा ठेकेदारांवर कडक कारवाई करून तात्काळ पगार देण्यात यावा, अशी आक्रमक भूमिका कामगार व नागरिकांमधून घेतली जात आहे.

टैग्स: Risod Garbage Gadi